मुंबापुरीत 'मराठा'शाही

मुंबापुरीत 'मराठा'शाही
मुंबापुरीत 'मराठा'शाही
मुंबापुरीत 'मराठा'शाही
मुंबापुरीत 'मराठा'शाही
See all
मुंबई  -  

गेले काही महिने राज्यभर घोंगावणारं भगवं वादळ अखेर मुंबईत धडकलं. 9 ऑगस्ट 2017 हा 'चले जाओ' चळवळीचा 75 वा वर्धापनदिन. स्वाभाविकच या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व आहे. ब्रिटिशांना भारताबाहेर हाकलण्यासाठी सुरु झालेल्या आंदोलनाच्या महोत्सवी वर्षाचा मुहूर्त साधून राज्यभरातील मराठा समाज आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुंबापुरीच्या रस्त्यावर एकवटला आणि पुन्हा एकदा इतिहास रचला गेला. मराठा आरक्षण, कोपर्डी प्रकरणातील गुन्हेगारांना फाशी, अॅट्रोसिटीच्या कायद्याचा गैरवापर नको आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी महामोर्चाचं रणशिंग फुंकलं गेलं. याआधीच्या शांततापूर्ण अशा 57 मोर्चांचा अनुभव गाठीशी असलेले मोर्चाकरी त्यांच्या शिस्तीसाठी कौतुकप्राप्त ठरले आहेत. आपला हाच लौकिक मुंबईतल्या महामोर्चातही त्यांनी कायम ठेवला. अपवाद मोर्चा समारोपाकडे वळत असताना झालेल्या काही मोजक्या अप्रिय घटनांचा.



महामोर्चाचा महाप्रारंभ

भायखळातल्या वीरमाता जिजाबाई उद्यान अर्थात राणीच्या बागेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून मोर्चा सुरू झाला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा मोर्चेकरी मुंबईत दाखल झाले होतेच. महामुंबई महामराठामय झाली. भगव्या रंगाने जणू न्हाऊन निघाली. जे जे उड्डाणपूल किती भक्कम आहे, याची जणू शहानिशा करण्यासाठी जणू आंदोलकांचं भगवं वादळ काही क्षण थबकलं. यापूर्वीचा गर्दीचा उच्चांक कोणता आणि कधीचा? हा स्वाभाविक प्रश्न आणि त्याला जोडून दिलं जाणारं ''हाच नवा उच्चांक'' हे उत्तर मोर्चाची भव्यता पटवून देत होता. गर्दीत लपतील ते मराठा मोर्चेकरी कसले? लाखांच्या गर्दीत उठून दिसणारे चेहरेही कमी नव्हते. बोरीवली येथे राहणारे दत्ता सदानंद परुळेकर, वय वर्षे ५६, हे त्यातलेच एक. कधीकाळी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेला न चुकता उपस्थित राहणारे परुळेकर आपल्या अॅटलस सायकलवर स्वार होऊन ज्या  दिमाखाने मोर्चात वावरत होते, तो दिमाख पाहण्यासारखाच होता. ठाणे आणि नवी मुंबईतल्या मोर्चानंतर हा अवलिया मुंबईच्या मोर्चातसुद्धा कर्तव्यभावनेने सहभागी झाला. 



 

बोलके बॅनर्स

'कोण म्हणतं देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय'सारख्या घोषणा देत स्वतःच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यापेक्षा समाजाची व्यथा मांडणारे फलक बरंच काही बोलून जात होते. मराठा समाज अनेक वर्ष सत्तेची चव चाखतोय. गर्भश्रीमंत मराठ्यांना आरक्षण हवंच कशाला? या प्रश्नाचं उत्तरही हे फलक देत होते. 



साक्षात छत्रपती शिवाजी महाराज...

कुणीही अतिमहत्त्वाची व्यक्ती येवो, तिच्याबद्दल फारशी आपुलकी न दाखवणारे मोर्चेकरी महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं आराध्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखी वेशभूूषा करून आलेल्या व्यक्तीसोबत 'सेल्फी' घेण्याचा मोह आवरत नव्हते.  



जनजागृतीसुद्धा...

जात-धर्माच्या सीमारेषा ओलांडत, माणूसकी हेच एकमेव नातं जपत मोर्चेकरी मराठ्यांच्या सेवेला तत्पर असलेले भिन्नभाषिक, भिन्नधर्मीय या देशातल्या विविधतेतल्या एकतेचं प्रतिरुप दाखवत होते. मोर्चेकऱ्यांना स्वयंस्फूर्तीने पाणी, जेवण देणारे हात कोणत्या जाती-धर्माचे होते, हा प्रश्नच गौण ठरला. आरोग्यविषयक जागृतीही रस्तोरस्ती पहायला मिळत होतीच.



ध्येयवेडात मराठे वीर दौडले...

सकाळी 11 वाजून 06 मिनिटांनी मोर्चा सुरू झाला होता.  शिस्तबद्ध गर्दी म्हणजे काय? हे सिद्ध करत पुढेपुढे सरकणारा मोर्चेकरी दुपारच्या रखरखत्या उन्हाची तमा कसली बाळगतोय! एव्हाना ही मुंबापुरीचा परिसर हा तापलेल्या निखाऱ्यासारखा प्रज्वलित होऊ पाहत होता. आरक्षणाच्या ध्येयाने वेडे झालेले शिवरायांचे मावळे एक एक पाऊल टाकत पुढे सरकत होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास हा मोर्चा आझाद मैदानापर्यंत पोहोचला. आझाद मैदानात उभारण्यात आलेल्या व्यासपीठावरुन उपस्थितांना संबोधित करण्यात आलं. दुपारी साडेबाराच्या सुमारास आझाद मैदानात पोहोचलेल्या मोर्चाचे दुसरे टोक राणीच्या बागेच्याही पलीकडे होते, यावरून मोर्चाच्या भव्यतेचा अंदाज यावा. जाणकारांच्या मते हा संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वाधिक भव्य मोर्चा होता. 

मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यव्यापी आंदोलनासाठी मंगळवारपासून अनेक मराठा समाजाच्या लोकांनी मुंबईत हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. मोर्चेकऱ्यांनी रात्रीपासून मुंबापुरी परिसरात तळ ठोकला होता. सकाळी कोकणसह राज्याच्या इतर भागातून लांब पल्ल्याच्या गाड़यांमधून मोर्चेकऱ्यांनी मुंबई गाठली. 



मोर्चा आणि राजकारण

या मूक मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप नव्हता. मात्र राजकीय पक्षांचे नेते मराठा समाजाच्या समर्थनार्थ एकवटलेले दिसून आले. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, काँग्रेस आमदार भाई जगताप आदींसह सर्वच राजकीय पक्षांचे नेते यामध्ये सहभागी झाले होते. आझाद मैदानात पोहोचल्यानंतर नारायण राणे हे मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळासह मंत्रालयात निघून गेले.



आशिष शेलारांना धक्काबुक्की?

मोर्चेकऱ्यांच्या रोषालाही लोकप्रतिनिधींना सामोरं जावं लागलं. भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष, आमदार अॅड. आशिष शेलार यांनी मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर  आझाद मैदानातील व्यासपीठावर जाण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना 'मराठा क्रांती मोर्चा'च्या समन्वयकांनी अडवलं. तुमचं काम हे विधिमंडळात असून इथे लूडबूड आणि चमकोगिरी करण्यापेक्षा विधिमंडळात जावून आमचा प्रश्न मांडा, असे खडे बोल सुनावत त्यांना धक्काबुक्की केली. शेलार यांनी यापूर्वी दोन वेळा मराठा समाजाचा मोर्चा रद्द करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांच्यावर समाजाचा राग असल्याचा समन्वयकांचा दावा होता. मात्र, धक्काबुक्की किंवा बाचाबाचीसारखा कोणताही अनुचित प्रकार शेलार यांच्यासोबत घडला नसल्याचा दावा शेलार यांच्या वतीनं करण्यात आला. 


वरुणराजासुद्धा खुश

मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर दोनदा पावसाच्या सरी कोसळल्या. पण या पावसाची तमा न बाळगता भिजतच मोर्चेकरी पुढे नि॑घाले. एकाही मोर्चेकऱ्यानं पावसात आपली छत्री उघडली नाही. एक मराठा भिजतोय, दुसराही सोबतीने  भिजणार, हे ब्रीदच जणू प्रत्येकानं पाळलं. पाऊससुद्धा बहुतेक ध्येयाचे निखारे  विझवायला नाही, तर मोर्चेकऱ्यांचा उत्साह वाढवायला आला होता.  



उत्कर्षबिंदू...

दुपारी दीडच्या सुमारासच आझाद मैदानाची क्षमता संपली. एकाबाजुला मोर्चा पुढे पुढे सरकत असतानाच आझाद मैदानातील लोकांची क्षमता संपत चालली होती. त्यामुळे अखेर स्वयंसेवकांनी ध्वनीक्षेपकांवरुन आवाहन करत पुढे न सरकता आहात त्याच ठिकाणी रहा, अशी उद्घोषणा केली. मराठा समाजाच्या पाच भगिनींनी केलेली भाषणं हा मोर्चाचा सर्वार्थानं उत्कर्षबिंदू होता. स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवणारी भाषणं मोर्चेकऱ्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढवत होती. 




कसोटीचे प्रसंग

मोर्चेकरऱ्यांच्या उत्साहाची परीक्षा पाहणारे प्रसंगसुद्धा घडले. उत्साहाबरोबर भावनातिरेक झाल्याच्याही घटना घडल्या. आमदार नितेश राणे, आमदार नरेंद्र पाटील व्यासपीठावर गेल्याने आता उदयनराजे भोसले यांनाही बोलवा, ही उदयनराजे समर्थकांची आग्रही मागणी, नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपल्या मागण्या पूर्ण करत आहोत, असं लेखी आश्वासन घ्यावं, या मागणीसाठी आक्रमक झालेले मोर्चेकरीसुद्धा मोर्चात पहायला मिळाले. 


चोख सुरक्षा, ड्रोनही कार्यान्वित

इतका मोठा जमाव येणार म्हटल्यावर पोलीस यंत्रणासुद्धा साहजिकच कार्यान्वित झाली होती. मोठ़या प्रमाणात मराठा समाजाचे लोक या मोर्चात सहभागी होणार असल्यामुळे महापालिका मुख्यालयासमोरील सेल्फी पॉइंटच्या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याचं लक्ष होतं. पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलावण्यात आली होती. याबद्दलची आणि सुरक्षेसंदर्भातली सर्व व्यवस्था राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर जातीनं पोलीस नियंत्रण कक्षातून पाहत होते.  



...कहाणी सुफळ, संपूर्ण?

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या आंदोलकांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन दिल्यानंतर मोर्चेकऱ्यांपैकी काही सुखावले, तर जोपर्यंत सर्व बाबींची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत काहीही बोलण्यात अर्थ नाही, अशी काहींची भावना आहे. एकूणात विचारांत भिन्नता ही असायचीच. पण मराठाहितासाठीचा आचारात मात्र कोणतीही भिन्नता नाही, हे आतापर्यंतच्या मराठा क्रांती मूक मोर्चाचं वैशिष्ट्य राहिलं आहे, जे अबाधित ठेवण्याचं आव्हान या समाजाला पेलून दाखवायचं आहे.   



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.