Advertisement

ब्रिच कँडीजवळील 11 स्टॉल्सचे परवाने रद्द


ब्रिच कँडीजवळील 11 स्टॉल्सचे परवाने रद्द
SHARES

अटी आणि शर्थींचा भंग केल्याप्रकरणी दक्षिण मुंबईतील भूलाभाई देसाई मार्गावरील 11 स्टॉल्सचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. स्टॉलधारकांना ज्या वस्तूंच्या विक्रीसाठी परवाना दिला होता, त्याव्यतिरिक्त अन्य वस्तूंची विक्री करण्यात येत असल्यामुळे येथील 11 स्टॉल्सचे परवाने रद्द करून त्या सर्व स्टॉल्सवर शुक्रवारी कारवाई करण्यात आली आहे.

भूलाभाई देसाई मार्गावर ब्रिचकँडी रुग्णालय आणि जुन्या अमेरिकन दुतावासा जवळील परिसरात वेगवेगळ्या वस्तू विक्रीच्या अनुषंगाने फेरीवाल्यांना परवाने देण्यात आले होते. परंतु या फेरीवाल्यांना ज्या अटी आणि शर्थींच्या आधारे लायसन्स देण्यात आले होते, त्याचेच उल्लंघन त्यांच्याकडून केले होते. परवान्या व्यतिरिक्त अन्य वस्तूंच्या विक्रीसह निश्चित जागेपेक्षा अधिक जागेचा वापर करणे, परवानाधारक व्यक्तीऐवजी दुसऱ्याच व्यक्तीकडून स्टॉल्स चालवला जाणे, अशाप्रकारे नियमबाह्य आणि बेकायदेशीर बाबी आढळून आल्या. त्यामुळे या सर्वांचा तपासणी अहवाल पूर्ण झाल्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. परंतु त्यानंतरही कोणतीही सुधारणा त्यांच्या वर्तनात न झाल्यामुळे 11 स्टॉल्सचे परवाने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे 11 स्टॉल्सधारकांचे परवाने रद्द करण्यात आले असून, यासर्व स्टॉल्स धारकांवर शुक्रवारी कारवाई करण्यात आली आहे. 

या स्टॉल्स धारकांमध्ये पंजाबसिंद, रॅप्स अॅण्ड रोल्स यासारख्या स्टॉल्सचा समावेश आहे. या दोन्ही स्टॉल्सकडे प्रोव्हिजन स्टोअर्सचा परवाना आहे आणि प्रत्यक्षात ते खाद्यपदार्थ तथा दुग्धजन्य पदार्थ विक्री करत होते. या सर्वांवर उपायुक्त सुहास करवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली असून, हे सर्व स्टॉल्स तोडण्यात आल्याचे डी विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास क्षीरसागर यांनी सांगितले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा