Advertisement

सोशल मीडियावर महिलांची बदनामी कराल तर...


सोशल मीडियावर महिलांची बदनामी कराल तर...
SHARES

सोशल मीडियावर महिलांच्या विरोधात केली जाणारी अवमानकारक आणि अश्लील वक्तव्ये किंवा टिप्पणी करण्याच्या प्रकारांना रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग लवकरच पाऊल उचलणार आहे. यावर आयोग लवकरच राज्य सरकारला उपयुक्त सूचनांचा समावेश असणारा अहवाल सादर करणार असल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली.

विजया रहाटकर यांनी राज्याच्या महिला, बाल आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर ही माहिती दिली. आयोगाच्या अहवालाचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करत त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करेल, अशी हमी पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली.


समाज माध्यमातून अवमानकारक वक्तव्ये

सोशल मीडियावर महिलांना त्रास देणे, अपमानकारक वक्तव्ये आणि टिप्पणी करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. नोकरदार महिला, खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आणि अगदी महिला लोकप्रतिनिधी यांच्याकडूनही यासंदर्भात महिला आयोगाला सातत्याने तक्रारी येत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी योग्य पावले उचलण्याची नितांत गरज निर्माण झाल्याचं आयोगाला वाटत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.


अहवाल सरकारला सादर करणार

जाहीर अपमानकारक टिप्पणीचा त्या महिलेच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होण्याची भीती असते. म्हणून तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असलेल्या समितीकडून यासंदर्भात अभ्यासपूर्ण अहवाल तयार करून तो राज्य सरकारला शक्य तितक्या लवकर सुपूर्द केला जाईल, असं रहाटकर यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा