Advertisement

बेपत्ता पत्नी येताच 'त्यानं' पोलीस स्टेशनमध्येच घेतलं स्वतःला पेटवून


बेपत्ता पत्नी येताच 'त्यानं' पोलीस स्टेशनमध्येच घेतलं स्वतःला पेटवून
SHARES

बेपत्ता पत्नी पोलीस ठाण्यात आल्याचे समजताच पतीने पोलीस ठाण्यात जाऊन स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना ताडदेव पोलीस ठाण्यात घडली. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवत तरुणाला नायर रुग्णालयात दाखल केले.

ताडदेव पोलीस कॉलनी येथे राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाचे २०२० मध्ये लग्न झाले. एकत्रित कुटुंबात राहणाऱ्या या तरुणाचे पत्नीसोबत खटके उडू लागले.

क्षुल्लक कारणावरून वारंवार भांडण होत असल्याने २ दिवसांपूर्वीच पत्नी घरातून निघून गेली. बुधवारी या तरुणानं ताडदेव पोलीस ठाणे इथं जाऊन पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार केली.

पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत तिचा शोध सुरू केला. सदर विवाहितेचा शोध लागल्यानंतर तिला जबाब देण्यासाठी ताडदेव पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले. संध्याकाळी ही विवाहिता जबाब देण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्याचे कळताच तिचा पती पोलीस ठाण्यात आला. 

पोलीस ठाण्याच्या आवारात शिरण्याआधीच त्याने अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्यानंतर पत्नीसमोर जात त्याने स्वत:ला पेटवून घेतले. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्वरित त्याच्या अंगावरील आग नियंत्रणात आणली. 

या घटनेत भाजल्याने जखमी झालेल्या या तरुणाला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा