Advertisement

बीडीडीतील रहिवाशांच्या पात्रता निश्चिती प्रक्रियेला सुरूवात


बीडीडीतील रहिवाशांच्या पात्रता निश्चिती प्रक्रियेला सुरूवात
SHARES

बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा नारळ फोडल्यानंतर आता म्हाडाने प्रत्यक्ष पुनर्विकासाच्या कामाला वेग दिला आहे. त्यानुसार नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळीतील रहिवासी आणि स्टाँलधारकांच्या पात्रता निश्चितीच्या प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. 17 मे पासून ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळीतील इमारतींपासून या सर्वेक्षणाला सुरूवात होणार असल्याची माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी दिली आहे. हे सर्वेक्षण टप्प्या टप्प्यात होणार असून त्यात पात्रता निश्चिती अत्यंत महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे या सर्वेक्षणाच्या वेळी मूळ मालकाने कागदपत्रांसह हजर राहणे आवश्यक असणार आहे.

म्हाडाने नायगावमधील रहिवाशांना सर्वेक्षणाची नोटीस पाठवली असून त्यानुसार 17 मे रोजी ना. म. जोशी मार्ग येथील इमारत क्रमांक 3, 4, 5, 6, 11, 12 आणि 30 या इमारतींमधील रहिवाशांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच या इमारतींच्या परिसरातील स्टाॅलधारक आणि धार्मिक स्थळांचेही यावेळी सर्वेक्षण होणार आहे.

मूळ भाडेकरू असल्याची कागदपत्रे आवश्यक-
बीडीडी चाळीतील रहिवासी हे मूळचे भाडेकरु असल्याने त्यांच्याकडे वास्तव्याचे योग्य ते पुरावे असणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या पुराव्यांआधारेच रहिवाशांची पात्रता निश्चित केली जाणार आहे. तर स्टाॅलधारकांना 13 जून 1996 च्या वास्तव्याचे पुरावे सादर करावे लागणार आहेत. या पात्रता प्रक्रियेत पात्र ठरणारे रहिवासी आणि स्टाॅलधारकच पुनर्वसनासाठी पात्र ठरणार असल्याने यापुढे प्रत्येक सर्वेक्षणाच्या वेळी रहिवाशांसह स्टाॅलधारकांनी हजर रहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण बायोमेट्रिक पद्धतीने होणार असल्याने मालकांच्या हाताचे ठसे आणि फोटो महत्त्वाचे असणार आहेत.

...तर रहिवासी करणार विरोध -
म्हाडाने सर्वेक्षणाला अर्थात रहिवाशांच्या पात्रता निश्चितीला सुरूवात केली असून त्यास काही बीडीडीवासियांचा विरोध आहे. रहिवाशांच्या समंतीशिवाय हा प्रकल्प राबविला जात असल्याचा आरोप करत या सर्वेक्षणाला रहिवासी विरोध करतील, अशी माहिती बीडीडीतील रहिवासी किरण माने यांनी दिली. रहिवाशांची संमती घेत इतर मागण्या मान्य केल्या तरच पुनर्विकास मार्गी लावू दिला जाईल, असा इशाराही माने यांनी दिला आहे.

तर, लाखे यांनी मात्र रहिवाशांचा कोणताही विरोध या प्रकल्पाला नसल्याने सर्वेक्षणामध्ये कोणताही अडथळा येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा