Advertisement

राहुल शेवाळेंच्या स्वच्छता मोहिमेकडे आमदार, नगरसेवकांची पाठ


राहुल शेवाळेंच्या स्वच्छता मोहिमेकडे आमदार, नगरसेवकांची पाठ
SHARES

अनंतचतुर्दशीला समुद्रात मोठ्याप्रमाणात गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात येत असल्यामुळे चौपाटी आणि परिसरात असणारी कचरा साफ करण्यासाठी शिवसेना खासदार राहुल शेवाळेंनी सोमवारी स्वच्छता मोहीम राबवली. परंतु, चौपाटीवरील स्वच्छता मोहिमेकडे शिवसेनेच्याच आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली.
त्यामुळे महाविद्यालयीन मुलांसह स्वच्छता मोहिमेत राबवून शेवाळेंनी तिथून काढता पाय घेतला. स्वच्छता मोहिमेचा उपक्रम हा भाजपाच असून त्यांच्या उपक्रमाला शिवसेना म्हणून सहकार्य करता येणार नाही. याच विचाराने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी चौपाटीवरील स्वच्छतेत भाग घेतला नसल्याचं बोललं जात आहे.

IMG-20180924-WA0052.jpg

दरवर्षी अनंतचतुर्दशीनंतर दादर चौपाटीवर मोठ्या प्रमाणात जमा होणारे निर्माल्य आणि इतर कचरा साफ करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढाकार घेत असतात. परंतु यंदा स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात स्वच्छता पंधरवडा साजरा केला जात असल्यानं याचं औचित्य साधून या दादर चौपाटीवर स्वच्छता राखण्याचा निर्णय शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी घेतला होता. या मोहिमेत आमदार सदा सरवणकर, सभागृहनेत्या विशाखा राऊत, नगरसेवक समाधान सरवणकर, नगरसेविका प्रिती पाटणकर हे सहभागी होणार होते. परंतु, सोमवारी सकाळी या मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर आमदार, नगरसेवक तिथं फिरकले नाही.


एसआयईएसचे विद्यार्थी सहभागी

मुंबईच्या एसआयईएस महाविद्यालयाच्या सुमारे १०० मुलांसह शेवाळेंनी या स्वच्छतेत भाग घेतला. परंतु, शिवसेना पदाधिकारी उपस्थित नसल्याची खंत त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शेवाळे यांनी, ' गणेश विसर्जनानंतर दादर चौपाटीला पुन्हा पूर्ववत करण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांसोबत विविध सेवाभावी संस्था नेहमीच पुढाकार घेत असतात.
या सर्वांसोबत यंदा विद्यार्थीही या उपक्रमात सहभागी झाल्याने ही मोहीम व्यापक झाल्याचं सांगितलं. सध्या देशभरात सुरू असलेल्या स्वछता पंधरवड्यात सर्व नागरिकांनी सहभागी व्हायला हवं' असं आवाहन शेवाळे यांनी केलं.


मग आम्ही जाणार कसे?

स्वच्छता पंधरवड्यात स्वच्छता मोहीम उपक्रम हाती घेण्याचा कोणताही निर्णय पक्षाकडून आलेला नाही. किंबहुना पक्षाच्यावतीनंही अशाप्रकारचा उपक्रम राबवला जात नाही. एकप्रकारे भाजपाचा अजेंडा राबवत असल्याचा संदेश जाईल, याच भीतीने शिवसेनेचे पदाधिकारी यात सामील न झाल्याचे बोललं जात आहे.
याबाबत शिवसेना नगरसेवक समाधान सरवणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी खासदार राहुल शेवाळे हे अशाप्रकारची स्वच्छता राबवणार आहेत, अशी माहितीही दिली नव्हती. त्यामुळे आम्ही जाणार कसे? असा सवाल त्यांनी केला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा