मुंबई महापालिकेने चार ठिकाणी बहुस्तरीय रोबोटिक पार्किंग उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे माटुंगा रेल्वे स्थानकाबाहेरील रोबोटिक पार्किंग प्रकल्प गुंडाळावा लागला. यापाठोपाठ मुंबादेवी येथील प्रकल्पही बंद करण्याचा महापालिकेचा विचार आहे. यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल.
मुंबई महापालिकेची मुंबईतील रस्त्यांवरील पार्किंगची जागा मेट्रो, विविध विकासकामे आदी कारणांमुळे कमी होत आहे. त्यामुळे महापालिकेनेही बहुस्तरीय रोबोटिक पार्किंगबरोबरच रस्त्यांवरील पार्किंग सुविधेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेने वरळी इंजिनीअरिंग हब, मुंबादेवी, हुतात्मा चौक, अप्सरा पेन शॉपजवळ आणि माटुंगा पूर्वेला रेल्वे स्थानकाबाहेर बहुस्तरीय रोबोटिक पार्किंग उभारण्याचा निर्णय घेत कामालाही सुरुवात केली. मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे माटुंगा आणि मुंबादेवी येथील कामे रखडली.
माटुंग्यातील वाहनतळ प्रकल्प बंद करण्याचा निर्णय महापालिकेने नुकताच घेतला. त्यापाठोपाठ मुंबादेवी प्रकल्पही गुंडाळण्याच्या तयारीत महापालिका आहे.
मुंबादेवी परिसरात 546 चारचाकी वाहनांसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यासाठी जवळपास १४ मजली वाहनतळ उभारणीसाठी कामही सुरू केले होते, यासाठी 122 कोटी रुपये खर्च करण्यात येणार होते. त्यासाठी पायाही रचण्यात आला.
मुंबादेवी मंदिर व्यवस्थापनाने या प्रकल्पाला विरोध केल्यामुळे, वाहनतळाचे काम विधानसभा अध्यक्षांच्या आदेशानुसार काही महिन्यांपासून स्थगित करण्यात आले आहे. मात्र प्रकल्पाचा खर्च वाढत असल्याने काम सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती महापालिका आयुक्तांनी राज्य सरकारला मध्यंतरी केली होती.
हेही वाचा