Advertisement

बाणगंगेच्या जीर्णोद्धाराचा मार्ग मोकळा

जीर्णोद्धार प्रकल्प दोन टप्प्यात विभागला गेला असून तो पुढील वर्षापर्यंत पूर्ण होईल.

बाणगंगेच्या जीर्णोद्धाराचा मार्ग मोकळा
SHARES

बाणगंगा परिसरात असलेली 12 बांधकामे गुरुवारी जमीनदोस्त करण्यात आली. अनेक वर्षांपासून बांधकामांवर हातोडा चालवण्यात आल्याने येथील मोकळ्या झालेल्या जागेचा वापर अधिकाधिक नागरी सुविधा देण्यासाठी होणार आहे.

तसेच बाणगंगेच्या जीर्णोद्धाराचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच परिसरातील एक रस्ता 'भक्ती मार्ग' म्हणून विकसित करण्यात येणार असून वाराणसीच्या धर्तीवर उद्यान विकसित करण्यात येणार आहे.

वाळकेश्वर परिसरातील जीर्णोद्धार कामांमध्ये बाणगंगा तलाव व सभोवतालचा परिसर, रामकुंडालगतच्या परिसराची स्वच्छता, तलावाच्या पायऱ्यांची तसेच संरक्षक भिंतींची आणि दीपस्तंभाची दुरुस्ती व जीर्णोद्धार, तलावाचे आतील बांधकाम हटवणे, बटरफ्लाय झडप दुरुस्ती आणि सुधारणा अशा महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश आहे.

मुंबई उपनगर जिल्हा पालक मंत्री तथा स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा यांनी या तलाव परिसरातील बांधकामे हटवून तलावाचा पुरातत्त्व वारसा जपण्यासाठी कामे हाती घेण्याचे पालिकेला निर्देश दिले होते. त्यानुसार या जीर्णोद्धार कामांचे नियोजन करण्यात आले आहे.

पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल तसेच अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी बाणगंगा परिसर जीर्णोद्धार कामांच्या निमित्ताने आवश्यक कार्यवाही वेगाने करण्याचे निर्देश दिले होते. त्यामध्ये प्रामुख्याने जीर्णोद्धार कामांमध्ये अडथळा ठरणारी आणि मागील कित्येक वर्षांपासून असलेली बांधकामे हटवताना महानगरपालिका आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) च्या माध्यमातून संयुक्तपणे पुनर्वसनाची कार्यवाही करण्यात आली आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मंजुरीनंतर बाणगंगा परिसरात राहणाऱ्या 12 कुटुंबांना नजीकच्या पुनर्वसन प्रकल्पाच्या ठिकाणीच पर्याय झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून देण्यात येणार आहे. नागरिकांकडूनही या पुनर्वसनासाठीचे संमतीपत्र मिळाले आहे, अशी माहिती डी विभागाने दिली आहे.

'डी' विभागातील विविध ऐतिहासिक ठिकाणांचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. बाणगंगा तलाव परिसर जीर्णोद्धाराचाही समावेश आहे. हा प्रकल्प "विशेष प्राधान्य प्रकल्प" म्हणून घोषित करण्यात आला आहे. वारसा स्थळांच्या यादीत ‘श्रेणी-1’मध्ये समाविष्ट असणाऱ्या बाणगंगा परिसराला जीर्णोद्धार कामे पूर्ण झाल्यानंतर नवीन आणि आकर्षक रूप लाभणार आहे.

उपायुक्त (परिमंडळ 1) डॉ. संगीता हसनाळे यांच्या निर्देशाखाली व सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांच्या देखरेखीखाली डी विभाग कार्यालयाच्या वतीने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.



हेही वाचा

पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी वरळीत अत्याधुनिक रोबो अँड शटल पार्किंग

भायखळा, क्रॉफर्ड, फोर्ट आणि गेटवेला मुंबई मेट्रो 11 ने जोडणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा