भटक्या कुत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे वृत्त समोर आले आहे. 2014 मध्ये केलेल्या भटक्या कुत्र्यांच्या गणनेनुसार मुंबईतील त्यांची लोकसंख्या 95 हजार इतकी होती. आता मुंबई शहरातील भटक्या कुत्र्यांची लोकसंख्या 1 लाख 64 हजारांवर पोहोचली आहे. जी 2014 च्या तुलनेत जवळपास 72 टक्क्यांनी जास्त असल्याचे म्हटले जात आहे.
मुंबई पालिकेकडून भटक्या कुत्र्यांची पुढील गणना जानेवारी 2024 मध्ये केली जाणार आहे. तसेच फेब्रुवारी 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात रेबीज लसीकरण मोहीम हाती घेतली जाणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
दहा दिवसांत सुमारे एक लाख भटक्या कुत्र्यांचे लसीकरण केले जाईल, असे मुंबई पालिकेने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे. पीटीआयने यासंदंर्भातील वृत्त दिले आहे.
नागरी संस्थेने काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मंगळवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 26 भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस दिल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मुंबईतील 24 वॉर्डात भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. भटक्या कुत्र्यांना शोधणे, लसीकरण करणे हे खूपच आव्हानात्मक काम असते. अशावेळी पालिकेकडून जीपीएस मॅपिंगद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. गणना झालेल्या भटक्या कुत्र्यांवर विशिष्ट खूण करण्यात येते. त्यामुळे पुन्हा त्याच कुत्र्याची गणना केली जात नाही.
हेही वाचा