Advertisement

मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त; झव्हेरी बाजारात पोलीस आयुक्त स्वत: पोहोचले

मुंबईत कोरोना वाढत असून या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं १ मे पर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध म्हणजे जवळपास लॉकडाऊनच.

मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त; झव्हेरी बाजारात पोलीस आयुक्त स्वत: पोहोचले
SHARES

मुंबईत कोरोना वाढत असून या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं १ मे पर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध म्हणजे जवळपास लॉकडाऊनच. अशा ही लॉकडाऊनसदृश परिस्थिती लागू झाली असली तरी किराणा दुकानं, भाजी-फळे विक्री दिवसभर सुरू असल्यानं गुरुवारी अनेक ठिकाणी मुंबईकर घराबाहेर पडले. पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवून नियमभंग करणाऱ्यांवर बारीक नजर ठेवली होती. काही तुरळक ठिकाणी गुन्हे दाखल केल्याचं सोडलं तर मुंबईत पोलिसांनी कठोर कारवाई टाळल्याचं चित्र होतं. मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनीही झव्हेरी बाजारासारख्या गजबजलेल्या परिसरात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ मे पर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू करण्याची घोषणा केली. अत्यावश्यक सेवेतील कमर्चारी आणि अधिकारी यांच्याशिवाय कोणासही घराबाहेर पडण्यास मनाई केली. यानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनीही नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. मुंबईत गुरुवारी या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुंबईच्या काही भागात शुकशुकाट होता तर अनेक बाजारांमध्ये भाजी, फळे तसेच किराणा माल खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याचे चित्र होते.

याबाबत तक्रार आल्यानंतर पोलिस त्या ठिकाणी पोहोचून गर्दी हटविण्याचे काम करीत होते. दुसरीकडे मुंबईत येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी लावली होती. वाहनचालकांना थांबवून त्यांच्याकडे चौकशी केली जात होते. काही ठिकाणी यावरून पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रकारही घडले.

पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त लावला असला तरी गेल्यावर्षीप्रमाणे कठोर कारवाई करणे गुरुवारी टाळले. मात्र अनावश्यक प्रवास करताना पुन्हा आढळल्यास कडक कारवाईचा इशारा पोलिस देत होते. गुरुवारी मुंबईत कडक निर्बंधांना संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा