Advertisement

मुंबईची 'तुंबई' होण्याची ठिकाणं कमी होणार


मुंबईची 'तुंबई' होण्याची ठिकाणं कमी होणार
SHARES

सध्या मुंबईत पावसाळ्यात १५५ ठिकाणी पावसाचं पाणी साचतं. या सर्व भागांमध्ये पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागत आहे. यंदाच्या पावसाळ्यात ५५ ठिकाणी पावसाचं पाणी साचणार नाही, अशी उपाययोजना मुंबई महापालिकेनं केली अाहे. यंदा पावसाचे पाणी तुंबणार नाही, अशी ५५ ठिकाणे निश्चित करण्यात आलेली आहेत. या ५५ ठिकाणी विविध प्रकारच्या उपाययोजना राबवण्यात आल्यामुळे या भागांमध्ये पाण्याचा निचरा अत्यंत जलद गतीने होईल, असा विश्वास महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी व्यक्त केला आहे.



अायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली झाली बैठक

पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या कार्यालय सभागृहात सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, खातेप्रमुख यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सन २०१७च्या पावसाळ्यात पाणी तुंबण्याची जी १५५ ठिकाणे आढळून आली होती, त्या ठिकाणच्या पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होण्यासाठी विविध प्रकारची कामे हाती घेऊन उपाययोजना राबवण्याचे आदेश अजोय मेहता यांनी दिले होते. त्यानुसार याबाबत मासिक बैठकीत सादरीकरण व चर्चा झाली. यावेळी महापालिका आयुक्तांनी याबाबत सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांकडून माहिती घेऊन कामांचा आढावा घेतला. त्यानुसार येत्या पावसाळ्यात १५५ पैकी ५५ ठिकाणी पाण्याचा अधिक जलद गतीने निचरा होईल, असा विश्वास व्यक्त केला.


कामाचा नियमित अाढावा घेण्याचे अादेश

पाणी साचण्याच्या ठिकाणी सुरू असलेल्या कामांबाबत सहाय्यक आयुक्त, परिमंडळीय उपायुक्त व संबंधित अतिरिक्त आयुक्त यांनी आपापल्या स्तरावर नियमितपणे आढावा घ्यावा तसंच त्या ठिकाणी स्वत: भेटी द्याव्यात, असे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या बैठकीदरम्यान दिले. पाणी साचण्याच्या या ५५ ठिकाणी आपणही स्वतः भेट देऊन कामांचा आढावा घेऊ, असेही आयुक्तांनी सांगितले.


झाडांच्या फांद्यांची छाटणी शास्त्रशुद्धच

पावसाळ्याची पूर्वतयारी म्हणून महापालिकेच्या वतीने झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जाते. परंतु, काही कंत्राटदार अयोग्य पद्धतीने झाडांची छाटणी करत असल्याच्या तक्रारी येतात. अयोग्य पद्धतीने केलेल्या झाडांच्या छाटणीचे परिणाम झाडांच्या संतुलनावर तसेच झाडांशी संबंधित इतर बाबींवर होत असल्याचे गेल्या वर्षी निदर्शनास आले होते. या सर्व बाबींचा विचार करून वृक्ष छाटणी करताना ती शास्त्रशुद्ध व वैज्ञानिक पद्धतीनेच केली जावी, असे आदेशच उद्यान विभागाला दिले आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा