Advertisement

मुंबईत मुसळधार पावसाचा जोर, हवामान खात्याकडून रेड अलर्ट


मुंबईत मुसळधार पावसाचा जोर, हवामान खात्याकडून रेड अलर्ट
SHARES
मुंबई आणि उपनगरात शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला. हा जोर शनिवारपर्यंत कायम राहिल्याने ठिकठिकाणी पाणी साचलं. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर मुंबईत पाऊस सक्रिय असण्याची चिन्हे आहेत. शनिवार-रविवारी मुसळधार ते तीव्र मुसळधार पाऊस पडेल. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर परिसरात ‘रेड अॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे. 

पश्चिम किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने शुक्रवारी वर्तवला होता. त्यामुळे मुंबईसह किनारपट्टी भागात शनिवार आणि रविवारी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून शुक्रवारी व्यक्त करण्यात आली होती. या अंदाजाप्रमाणे मुंबईत शनिवार पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली. 

मुसळधार पावसामुळे परळ, दादर, माटुंगा,अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, कुर्ला, सायन, चेंबूर, विक्रोळी, घाटकोपर, कांजूरमार्ग या ठिकाणीही जोरदार पाऊस सुरु आहे. सोबतच कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवली, ठाणे, वसई-विरार, पालघर परिसरात पावसाच्या सरी रात्रीपासूनच कोसळत आहेत. 

पावसाचा परिणाम मुंबईतल्या लोकलसेवेववरही झाल्याने मुंबईतल्या हार्बर, सेंट्रल आणि पश्चिम रेल्वे मार्गांवरची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. दुपारी पावणे दोन वाजता वर्षातील मोठी भरती येण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने किनारपट्टी भागात राहणाऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने मुंबईकरांची, पुणेकरांची पाण्याची चिंताही मिटल्यात जमा आहे.

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा