Advertisement

‘यह आग कब बुझेगी’? मुंबईकरांनो स्वत:लाच विचारा प्रश्न

मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाला दक्ष मुंबईकरांची आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांची साथ जोवर मिळत नाही तोवर आगींच्या घटनांचा हा सिलसिला सुरुच राहणार आहे.

‘यह आग कब बुझेगी’? मुंबईकरांनो स्वत:लाच विचारा प्रश्न
SHARES

मुंबईत आगी लागण्याच्या वाढत्या घटनांकडे पाहता ‘यह आग कब बुझेगी’, असं म्हणण्याची वेळ मुंबईकरांवर आलीय. कारण दिवसाची सुरुवात आगीच्या दुघर्टनेनं होत असून रात्रीही आगीचं तांडव मुंबईकरांची झोप उडवू लागलं आहे.


वर्षभरात इतक्या आगी

साकिनाक्यातील खैराणी रोडवरील भानू फरसाण कारखान्याला लागलेल्या आगीनंतर तर आगींच्या घटनांनी रौद्ररुपच धारण केलंय. खरं पाहता अशा आगी लागणं या काही मुंबईला नवीन नाहीत. आगी तर लागतंच असतात. पण अशा घटनांमध्ये जेव्हा लोकांचे बळी जातात, तेव्हा त्या आगीबाबत आपण चिंता व्यक्त करतो. अग्निशमन दलाच्या दप्तरी मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत वर्षाला सरासरी ४ ते ४,५०० आगीच्या घटना घडत असतात. यात सरासरी ५० ते ६० जणांचे बळी जातात. सुमारे ५०० ते ६०० जण यात जखमी होत असतात.



चलता है अॅटीट्यूड कारणीभूत ?

परंतु सर्व प्रकारच्या आगींच्या मुख्य कारणांचा जर शोध घेतला तर बहुतांशी आगी या शॉर्टसर्किटमुळेच लागत असल्याचं समोर येतं. म्हणजेच ७५ ते ८० टक्के आगी या वीज तारांच्या शॉर्टसर्किटमुळेच लागत असतात. त्यानंतर गॅस सिलेंडर तसेच अन्यप्रकारच्या मनुष्याच्या सदोष चुकांमुळे आगी लागण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे मुंबई अग्निशमन दल हे कितीही अत्याधुनिक यंत्रणांनी सक्षम असलं तरी आपण आपलं “ चलता है, जब होगा तब देखेंगे” या स्वभाव गुणधर्माने आगीच्या दुघर्टनांना जबाबदार ठरत असतो. मुंबईत आगी का लागतात? असा प्रश्न आता सर्वांचाच मनात घोळत आहे. पण या प्रश्नांचे एक उत्तर आहे, ते म्हणजे आपलं अॅटीट्यूट. चालतंय, जेव्हा घडेल तेव्हा बघू हे अॅटीट्युट आहे, जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत आपल्या निष्काळजीपणामुळे आगीच्या घडत राहणार आहे.


गर्दीवर कंट्रोल नाही

मुंबईची लोकसंख्या वाढत आहे. नाही म्हटलं तरी मुंबईत एक किलोमीटरच्या परिक्षेत्रात सुमारे २७ ते २८ हजार लोक राहत आहेत. त्यामुळे या गर्दीवर आता कुणाचाही कंट्रोल राहिलेला नाही. साकीनाक्यातील भानू फरसाण कारखान्यातील आग असो वा कमला मिल कंपाऊंडमधील वन अबोव्ह व मोजोस बिस्ट्रो पबला लागलेली आग असो. या सर्व आगी मालकांच्या निष्काळजीपणामुळे आणि स्वभाव गुणधर्मामुळेच लागल्या आहेत.



जागा मिळवण्याची हाव

वाढत्या लोकसंख्येच्या या शहरात कमीत कमी जागेत आपला संसार, धंदा थाटावा लागतो. जी जागा आहे, त्याचाच तो वापर करत असतो. परंतु त्याची वाढती गरज आणि अधिक जागेची हाव हीच त्यांना अनधिकृत बांधकाम करायला प्रवृत्त करत असते. आहे त्याच जागेचा वापर करायचा असल्यानं किंबहुना दुसऱ्या कोणत्याही सुविधा नसल्यामुळे सुरक्षेचा विचार न करता प्रत्येक जण जागा अडवत असतो. साकिनाक्याची आग असो किंवा कमला मिलमधील आग असो. दोन्ही आगींची कारणं वेगवेगळी असली तरी निष्काळजीपणामुळेच या आगीच्या घटना घडल्याचं दिसून येतं.


ना देखभाल, ना दुरूस्ती

साकिनाक्यातील भानू फरसाण कारखाना हा छोट्याशा जागेत होता. त्यात त्यांनी पोटमाळा बांधला होता. याठिकाणी सतत पदार्थ तळले जात असल्यामुळे येथील वातावरणाने विजेची तार वितळून, नादुरुस्त होण्याची अधिक शक्यता होती. त्यातच तेल आणि गॅस सिलेंडरचा साठाही येथे होता. त्यात बाहेर पडण्यासाठी जागाही नव्हती. वीजेच्या तारांची न केलेली देखभाल व दुरुस्तीमुळे घटना होऊन १४ जणांचे बळी गेले.



जेव्हा होईल, तेव्हा बघू...

कमला मिलमधील घटना पाहिली तर हुक्क्यामधील जळता निखारा पडद्यावर पडून आग लागली. दोन पब एकत्र असताना, ज्वलनशील पदार्थाचा वापर होत असताना भविष्यात कोणती आपत्ती घडल्यास त्यांना सुरक्षित बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्गाचीही तरतूद न करणं हा निव्वळ निष्काळजीपणाच आहे. हा मार्ग असता तर सर्वजण तेथून बाहेर पडू शकली असती. पण हा जर आणि तरचा भाग आहे. भानू फरसाण कारखाना आणि वन अबोव्ह व मोजोस बिस्ट्रो पब मालकांच्या मनात अशाप्रकारच्या दुघर्टना होण्याची शंकेची पाल मनात चुकचुकली नाही, असं झालं नसेल. पण जेव्हाचं तेव्हा पाहिलं जाईल, असं म्हणत त्यांनीही याकडे दुर्लक्ष केलं आणि पुढे मोठा घात झाला.


शहरीकरण जबाबदार

आगीच्या मुख्य कारणाला वाढतं शहरीकरणच जबाबदार आहे. वाढत्या विकासामुळे धोके वाढत चाललेत. आगीची भीती प्रत्येकालाच आहे. त्या आगीच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी स्वत: पासून प्रयत्न करायला हवा, तो बदल लोकांमध्ये होताना दिसतं नाही. आगीच्या सुरक्षेचं ज्ञान असलं तरी त्याचा वापर करण्याची नसलेली मानसिकता हीच अनेक प्रकारे आगींच्या दुघर्टनांना कारणीभूत ठरताना दिसते.



जीवाला किंमत नाही

आगीच्या दुघर्टनांना प्रतिबंध करण्यासाठी याबाबत जीव सुरक्षेबाबत जनजागृती करणं ही आता काळाची गरज आहे. या मुंबई, भारतात लोकांच्या जीवाला किंमत उरलेली नाही. परदेशात कोणत्याही घटनेमुळे एका माणसाचा मृत्यू झाला तरी त्याचं संशोधन करून भविष्यात ते प्रकार कशाप्रकारे टाळता येतील याचा प्रयत्न केला जातो. कारण परदेशात प्रत्येक जीवाचं महत्व आहे. केवळ माणसाचंच नाही तर जनावरांच्या जीवालाही तिथं किंमत आहे.

मुंबईत आगीच्या दोन दुघर्टनांमध्ये २८ ते ३० जणांचे बळी गेल्यानंतर संपूर्ण देशभरात चिंता व्यक्त करण्यता आली. परंतु रेल्वे लोकलच्या खाली दिवसाला विविध प्रकारे सरासरी १० जणांचे जीव जातात, त्यावर कुणी बोलत नाही. कारण रेल्वेतून पडून किंवा अपघात होऊन लोकांचे जीव जाणं हे आपण गृहितच धरलं आहे. पण आगीच्या घटनांना आपण गृहित धरत नाही. आगीच्या घटनांमध्ये लोकांचे जीच जाणं हे गंभीरच आहे.


जनजागृती गरजेची

आगीच्या दुघर्टना घडल्यानंतर अग्निशम दलाच्या जवानांनी त्वरीत घटनास्थळी प्रकट व्हावं आणि आग विझवावी, अशीच लोकांची अपेक्षा असते. परंतु मुंबईतील वाहतूककोंडी आणि अरुंद रस्ते अतिक्रमणांनी अडवलेत. त्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होतो. यासाठी ३४ अग्निशमन केंद्र, मिनी अग्निमशन केंद्र उभारुन अग्निशमन दलाचा पसारा वाढवला जात असला तरी जोपर्यंत लोकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जनजागृती होत नाही, तोपर्यंत आगीच्या घटनांचा हा सिलसिला थांबला जाणार नाही.

मुंबईतील एकूण लोकसंख्येच्या ४५ ते ५० टक्के लोकसंख्या ही आजही दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्टी भागात राहत आहेत. तर दुसरीकडे जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती तशाच असून टोलेजंग इमारतीही वाढत आहेत. आजमितीपर्यंत मुंबईत सुमारे तीन ते सव्वातीन हजार गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत. अजूनही काही उभ्या राहत आहे. काहींना महापालिकेच्या माध्यमातून पुनर्विकासासाठी परवानगी दिलेली आहे. काही दिवसांपूर्वी अंधेरीतील इमारतीमध्ये लागलेली आग ही सुद्धा शॉटसर्किटमुळेच लागलेली आहे. त्यामुळे झोपडपट्टी असो वा इमारती सर्वच ठिकाणी शॉटसर्किटमुळेच आग लागल्याचे प्रकार समोर येत आहेत.



घराघरांत ट्रिपर बसवा

मुंबई महापालिकेने शॉटसर्किटमुळे लागणाऱ्या आगीच्या घटना कमी करण्यासाठी काही नियमावली बनवली आहे. यामध्ये प्रत्येक घरात विजेच्या जोडणीवर नियंत्रण ठेवणारा ट्रिपर बसवण्याची सूचना केली आहे. तसेच विजेचं तांत्रिक परिक्षण करून तपासणी अहवाल बनवण्याचीही अट घातली आहे. महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६च्या अंतर्गत अशा सर्व अटी व नियम लादूनही मुंबईकरांवर याची कोणतीही भीती राहिली नाही.


प्रवेशद्वाराजवळच्या केबिन

घाटकोपरमधील इमारतीला लागलेल्या आगीच्या दुघर्टनेनंतर जिन्याच्या प्रवेशद्वाराजवळ वीज मीटरची केबिन असल्यास ती हटवून स्वतंत्र ठिकाणी त्याची व्यवस्था करण्याचा ठराव करण्यात आला. परंतु मुंबईतील अशा किती इमारतींमधील इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या मीटर केबिन हलवल्या गेल्यात. कुठेच काही नाही. सध्याही कमला हॉटेलच्या दुघटनेनंतर मुंबईतील सर्व हॉटेल्ससह इतर खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कारखान्यांची आगप्रतिबंधक उपाययोजनांतर्गत तपासणी केली जातेय. पण अशाप्रकारे तपासणी करून मुंबईत ही आगीच्या दृष्टीकोनातून सुरक्षित राहिल, असं होणार नसून हा खेळ ८ ते १० दिवस चालेल. पुन्हा सर्व विसरले की जो तो सर्व नियम धाब्यावर बसवून काम करायला तयार.


मुंबईकरांची साथ हवीच

नियम असूनही या नियमांची अंमलबजावणी करण्याइतपत महापालिकेचे, अग्निशमन दलाचे अधिकारी तत्पर नाहीत. त्यामुळे जोवर अग्निसुरक्षेबाबत सर्वस्तरावर जनजागृती केल्याशिवाय तसेच कडक कायदेशीर कारवाईचा बडगा उगारल्याशिवाय मुंबईतील आगीच्या घटना नियंत्रणात आणता येणार नाही. यासाठी दक्ष मुंबईकरांची आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांची साथ जोवर मिळत नाही तोवर आगींच्या घटनांचा हा सिलसिला सुरुच राहणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा