
अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) तसेच स्थानिक अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मुंबईतील रेस्टॉरंट्स, स्ट्रीट फूड स्टॉल्स आणि वडापाव विक्रेत्यांची तपासणी केली. अन्नपदार्थ साठवण्यासाठी, पॅकिंगसाठी किंवा सर्व्ह करण्यासाठी वृत्तपत्र, मासिके किंवा इतर छापील कागदांचा वापर होत नाही ना, याची खात्री करण्यात आली.
तपासणीदरम्यान वृत्तपत्रांचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांना इशारा देण्यात आला असून बटर पेपर, फूड-ग्रेड पेपर आणि इतर मान्यताप्राप्त पॅकेजिंग साहित्य वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या.
मुंबईत अनेक वर्षांपासून वडापाव, भजी आणि इतर खाद्यपदार्थ वृत्तपत्रात गुंडाळून देण्याची पद्धत आहे. कमी खर्च आणि सहज उपलब्धता यामुळे अनेक विक्रेते जुन्या वृत्तपत्रांचा वापर करतात.
मात्र, अन्न सुरक्षा आणि मानके (पॅकेजिंग) नियम 2018 नुसार अन्नपदार्थांसाठी वृत्तपत्र किंवा इतर छापील कागदांचा वापर करण्यास स्पष्टपणे बंदी आहे. छपाईच्या शाईतील हानिकारक रसायने अन्नामध्ये मिसळून आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात, असा इशारा FSSAIने दिला आहे.
हे नियम फेरीवाले, स्ट्रीट फूड विक्रेते, रेस्टॉरंट्स, क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स (QSR), मोबाईल फूड विक्रेते आणि इतर सर्व खाद्य व्यवसायांवर लागू आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षित पॅकेजिंगचे पर्याय सहज उपलब्ध असून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने त्यांचा वापर करणे आवश्यक आहे. नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्यांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार दंडात्मक कारवाईही केली जाऊ शकते.
हेही वाचा
