Advertisement

नवी मुंबईकरांना भासतेय तीव्र पाणीटंचाई, पाणी प्रश्न सोडवण्याचं पालिकेचं आश्वासन

नवी मुंबईतील रहिवाशांना अलीकडे पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागत आहेत. अनेक भागामध्ये पुरेसे पाणी येत नसल्याने रहिवाशी हैरान झाले आहेत.

नवी मुंबईकरांना भासतेय तीव्र पाणीटंचाई, पाणी प्रश्न सोडवण्याचं पालिकेचं आश्वासन
SHARES

नवी मुंबईतील रहिवाशांना अलीकडे पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागत आहेत. अनेक भागामध्ये पुरेसे पाणी येत नसल्याने रहिवाशी हैरान झाले आहेत. काही ठिकाणी पाण्याची समस्या तात्पुरती आहे. मात्र, काही भागांमध्ये पाण्याच्या समस्येने उग्र रुप धारण केलं आहे. 

उलवे नोडमधील रहिवाशांना पाण्याचा टंचाईचा तीव्र सामना करावा लागत आहे. अचानक टाकीमध्ये येणारे पाणी बंद होते. काही दिवस तसंच काही आठवडेदेखील या ठिकाणी पाणी येत नाही, असं येथील रहिवाशांनी म्हटलं आहे. 

पेशाने शिक्षक असलेले अभिषेक सेंगर यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितलं की, उलवे येथे एका आठवड्यापासून सिडकोकडून पाणीपुरवठा होत नाही. महापालिकेकडून अद्याप यावर कोणतीच कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे पाण्यावाचून येथील नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. पाणीपुरवठा का होत नाही याबाबत लोकांना माहितीही मिळत नाही. येथे आता खूप कठीण परिस्थिती आहे

दरम्यान, नवी मुंबई महापालिका अभिजित बांगर म्हणाले की, पाणीटंचाईची फार मोठी समस्या नाही. फक्त झोपडपट्ट्यांमधून पाणीटंचाईची तक्रारी आमच्याकडे येतात. कमी दाबामुळे या ठिकाणी पाणीटंचाई भासते. तक्रारी आल्यावर आम्ही त्यांना पाण्याचे टँकर पाठवतो.

नवी मुंबईला मोरबे धरणातून पाण्याचा पुरवठा होतो. धरणातील पाण्याची मागणी कमी करण्यासाठी पाण्याचे वैकल्पिक स्त्रोत आम्ही शोधत आहोत. काही भागात पाइपलाइन उपलब्ध नसल्यामुळे मोरबे धरणाचे पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. मात्र, आता कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पाइपलाइनचे काम वेगाने सुरू झाले असून लवकरच यावर्षी मेपर्यंत रहिवाशांना पाणीपुरवठा सुरळीत होईल, असंही आयुक्तांनी म्हटलं आहे. 

यापूर्वी सिडकोने नवी मुंबईतील पाण्याचे संकट सोडवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला होता. सिडकोने हेटवणे धरणातून दररोज १२० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हेटवणे धरणातून मिळणारे अतिरिक्त पाणी दक्षिण नवी मुंबईतील विविध प्रकल्प, गावे आणि शहरांसाठी वापरले जाईल.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा