Advertisement

पवई तलावाच्या सुशोभीकरणासाठी नितीन देसाईंची संकल्पना?


पवई तलावाच्या सुशोभीकरणासाठी नितीन देसाईंची संकल्पना?
SHARES

मुंबईतील प्रदूषित पवई तलावाच्या सुशोभीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले असून या सुशोभीकरणात मदत करण्यासाठी प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई पुढे आले आहेत. एवढेच नव्हे, तर तलावाच्या सुशोभीकरणासंदर्भात देसाई यांनी महापालिका आयुक्तांसमोर सादरीकरणही केले आहे. या सादरीकरणानंतर सुशोभीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात देसाई यांच्या सूचनांचा विचार करण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले आहे.

पवई तलावाचे दोन टप्प्यात सुशोभीकरण होणार आहे. मागील काही वर्षांपासून पवई तलावाच्या आजूबाजूला अनेक झोपडपट्टया, इमारतींसह औद्योगिक कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. या सर्व झोपडपट्टया, इमारती आणि औद्योगिक कंपन्यांमधील सांडपाणी या तलावात सोडले जात आहे. या मलजलामुळे तलावातील पाण्याचा दर्जा खालावत चालला असून प्रदूषणाचा स्तर कमालीचा वाढला आहे.

सुशोभीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ही कामे होणार -
आयआयटीने काही महिन्यांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणानंतर तलावातील जलपर्णी काढण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली होती. पावणेसात कोटी रुपये खर्च करून ही जलपर्णी काढण्यात येणार आहे. त्याबरोबरच तलावात प्रक्रिया न करता सोडले जाणारे मलमूत्र व सांडपाणी बंद करणे, कायमस्वरूपी सांडपाणी प्रक्रिया योजना राबवणे, तलाव परिसरातील पदपथ व जमिनीवर निसर्गचित्र विकसीत करणे, निरीक्षण व सुरक्षा यंत्रणा विकसीत करणे, बगीचे व पदपथ बनवणे, तलावात संगीतमय कारंजे उभारणे, सूसर, मगर, फुलपाखरे यांच्यासाठी उद्यान विकसीत करण्यासाठी अहवाल बनवणे, तलावातील जलपर्णी व इतर आक्षेपार्ह वनस्पतींचा समूळ नाश करण्यासाठी उपाययोजना करणे आदी कामांकरता सल्लागार म्हणून 'फ्रिश्मन प्रभू कंपनी'ची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी 4 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. त्यानुसार सुशोभीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरु आहे.

पवई तलावाचे सुशोभीकरण आंतरराष्ट्रीय दर्जाचे, परदेशातील तलावांप्रमाणे व्हावे, यासाठी प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आपल्या कल्पनेतून कलाकृती साकारली आहे. त्याचे सादरीकरण बुधवारी नितीन देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांना दिले. यावेळी उपायुक्त रमेश बांबळे, उपायुक्त रमेश पवार,सहायक आयुक्त किरण दिघावकर आदी उपस्थित होते. आयुक्तांनी त्यांची भेट घेतल्यानंतर हे सादरीकरण त्यांनी अन्य अधिकाऱ्यांना दाखवण्याची सूचना केली. त्यानुसार परदेशातील तलावांच्या धर्तीवरील पवई तलावाच्या सुशोभीकरणाचे संकल्पचित्र देसाई यांनी अधिकाऱ्यांना दाखवले.

दुसऱ्या टप्प्यात देसाई यांच्या संकल्पनेचा विचार -
तलावाचे यापेक्षाही अधिक चांगल्याप्रकारे सुशोभीकरण करता येवू शकते आणि आपण त्यासाठी महापालिकेला मदत करू इच्छितो, असे त्यांनी कळवले. पवई तलावाबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या सुशोभीकरणाचा प्रस्तावही देसाई यांनी दिल्याचे समजते. मात्र, सुशोभीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरु असून त्यामध्ये या सूचनांचा विचार करणे अशक्य असल्याचे प्रशासनाच्यावतीने त्यांना सांगण्यात आल्याचे समजते. परंतु दुसऱ्या टप्प्यातील सुशोभीकरणासाठी निविदा मागवण्यात येत आहे. त्यामध्ये देसाई यांच्या संकल्पनेतील सूचनांचा विचार केला जावू शकतो, असे आश्वासन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी देसाई यांना दिल्याचे समजते.

संबंधित विषय
Advertisement