मंगळवारी सकाळपासून पाऊस कोसळत असला, तरी सात महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेला (pregnant women) तिच्या सात वर्षांच्या चिमुकल्याच्या दंतोपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रुग्णालय गाठणे गरजेचे होते. तिने दिवा स्थानकापासून सकाळी 9.45 वाजता लोकलप्रवास सुरू केला.
मजल-दरमजल करत ती कुर्ला स्थानकाच्या आधीपर्यंत पोहोचली आणि तिथे रेल्वेसेवा ठप्प झाली. पुन्हा दिवा स्थानकात परतेपर्यंत नऊ तास तिचे प्रवासहाल झाले.
सकाळी 9.11 वाजताची अर्धजलद लोकल डोंबिवली स्थानकावर नऊ वाजून 30 मिनिटांनी आली. मजल-दरमजल करत धीम्या मार्गावरून नाहुर स्थानकापर्यंत लोकल पोहोचली खरी, पण त्यानंतर तिचा वेग मंदावला.
भांडुप, कांजुरमार्ग, विक्रोळी आणि घाटकोपर (ghatkopar) या स्थानकांच्या रुळांवर काही भागांमध्ये पाणी साचले असल्यामुळे लोकल थांबत पुढे सरकत होती.
कुर्ला (kurla) स्थानकाजवळ लोकल आल्यानंतर ती जवळपास सव्वा तास एकाच जागी थांबली. आपापल्या घरी, ऑफिसमध्ये प्रवासाचे तपशील देणे सुरू होते. बाजूला जलद मार्गावर एकामागे एक अशा तीन लोकल उभ्या होत्या. तेच चित्र धीम्या मार्गावरही होते. यातील एका गाडीत सात महिन्यांची गर्भवती असलेली ही महिलाही अडकली.
घरी कधी आणि कसे पोहोचणार याची चिंता तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. रेल्वे पोलिस आणि त्या डब्यातील इतर महिलांच्या मदतीने तिने कुर्ला स्थानक गाठले.
दुपारी 1 वाजल्यापासून ती तिच्या मुलासह कुर्ला स्थानकावरच बसून राहिली होती. तीन वाजता एका धीम्या लोकलची घोषणा झाली.
गर्दीने भरलेली ती लोकल 4.45 वाजता कुर्ला स्थानकाहून सुटली. ती महिला संध्याकाळी 5.50 वाजता दिवा स्थानकावर उतरली. नऊ तासांचा तिचा हा प्रवास तिच्यासह त्या लहान मुलासाठीही वेदनादायी ठरला.
इतर लोकलमधील महिला प्रवाशांचेही हाल झाले. काही महिलाही पाण्याने भरलेल्या ट्रॅकमधून कुर्ला स्थानकाच्या दिशेने चालू लागल्या. त्यानंतर ट्रॅकमध्ये रेल्वे पोलिस येऊन 'लोकलमधून (mumbai local) उतरू नका, पाणी साचले आहे, लोकल लवकरच सुरू होईल’ असे सांगत होते.
पावसाचा जोर वाढत असल्यामुळे आणि कोणतीही ठोस सूचना मिळत नसल्याने प्रवाशांना काहीही करून कुर्ला स्थानक गाठायचेच असल्याने ते लोकलमधून उतरत होते.
काही वेळाने पोलिसांना माहिती विचारली असता त्यांच्याकडून शीव, माटुंगा आणि दादर भागात पाणी साचले असल्याने कदाचित मध्य रेल्वे बंद होईल, असे सांगण्यात आले. या भीतीने काही महिला प्रवासी गोंधळून गेल्या.
अखेरीस चर्चा करून आपणही उतरू या असे ठरवत पोलिसांना तसे सांगितले. पोलिसांनी त्यांना सुखरूप उतरवले. कुर्ला स्थानकावर आल्यावर दुपारी एक वाजता 'पुढील सूचना मिळेपर्यंत मध्य आणि हार्बर सेवा स्थगित करण्यात येत आहे' ही उद्घोषणा झाली. त्यानंतर लोकल सुरू झाली आणि त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
हेही वाचा