SHARE

वरळी - नायगाव आणि डिलाईड रोड येथील बीडीडी चाळीच्या बांधकामासाठी निविदा मागवल्यानंतर आता म्हाडाचे मुंबई मंडळ वरळी बीडीडीचा पुनर्विकास मार्गी लावण्याच्या मागे लागले आहे. त्यानुसार आता मुंबई मंडळाने वरळीतील बीडीडी चाळीच्या माती परिक्षणाच्या कामासाठी निविदा काढल्या आहेत.

वरळी पुनर्विकासात काही तांत्रिक अडचणी असल्याने येथील चाळींच्या पुनर्विकासांतर्गत बांधकामासाठी निविदा काढण्यात आल्या नाहीत. मात्र आता काही दिवसांतच माती परिक्षणाच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मंडळातील सूत्रांनी दिली आहे.

वरळीतील बीडीडी वासियांचा म्हाडाला विरोध असताना आणि अनेक तांत्रिक बाबींची पूर्तता झाली नसताना म्हाडा कामाची इतकी घाई का करतेय? असा सवाल बीडीडीतील रहिवासी किरण माने यांनी केला आहे. तर म्हाडाला अजूनही विरोध कायम असून माती परिक्षणाचे काम कोणत्याही परिस्थितीत सुरू करू देणार नाही, अशा इशाराही बीडीडीतील रहिवासी संघटनांनी दिला आहे. सध्या निवडणुकीची धामधूम आणि आचारसंहिता असल्याने निवडणुका संपल्यानंतर याविरोधात आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचेही माने यांनी सांगितले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या