Advertisement

अब की बार 'बेरोजगारी' की मार, बेरोजगारीचा दर ६.१ टक्क्यांवर


अब की बार 'बेरोजगारी' की मार, बेरोजगारीचा दर ६.१ टक्क्यांवर
SHARES

वर्षाला दोन कोटी रोजगार देऊ असं आश्वासन देऊन सत्तेत आलेलं भाजपा सरकार हे आश्वासन पूर्ण करण्यास फोल ठरलं आहे. तर दुसरीकडे अनेकांच्या होत्या त्या नोकऱ्याही हातातून गेल्या आहेत ते केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण अहवालानुसार, २०१७-१८ चा बेरोजगारीचा दर ६.१ टक्के वर गेला आहे. तर महत्त्वाचं म्हणजे नोटबंदीमुळे देशातील बेरोजगारी वाढल्यानं हा अहवाल केंद्र सरकारकडून रोखून धरण्यात आल्याचीही धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान गेल्या ४५ वर्षातील हा बेरोजगारीचा सर्वाधिक दर असल्याचंही राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण अहवालानं म्हटलं आहे.


४५ वर्षातील सर्वाधिक दर

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षणाच्या अहवालानुसार २०१७-१८ मध्ये बरोजगारीचा दर ६.१ टक्के झाला आहे. १९७२.७३ मध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक होता. त्यानंतर तब्बल ४५ वर्षांनी देशातील बेरोजगारीत वाढ झाल्यानं बेरोजगारीचा दर ६.१ टक्क्यांवर गेल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून समोर आली आहे. तर नोटबंदीमुळे देश आणि देशातील तरूण कसे बेजार झाले आहेत हे वास्तवही यानिमित्तानं समोर आलं आहे. दरम्यान राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या हंगामी अध्यक्षांना एका सदस्यानं सोमवारी, २८ जानेवारीला राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर हा अहवाल प्रकाशझोत आला आहे. मुळात हा नोटबंदीमुळे बेरोजगारी वाढल्यानं अहवाल रोखला जात असल्यानंच राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या अध्यक्षांसह सदस्यांनी राजीनामा दिल्याचंही वृत्त आहे. असं असलं तरी केंद्र सरकारकडून अजूनही हा अहवाल सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे सरकारच्या धोरणाबाबतच आता प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.


मोदींनाच बेरोजगार करण्याची आली वेळ

बेरोजगारीचा दर वाढल्याचं समोर आल्याबरोबर विरोधकांनी भाजपा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धारेवर धरण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मोदींवर निशाणा साधला आहे. हुकुमशाह मोदींनी वर्षाला २ कोटी रोजगार देऊ असं आश्वासन दिलं होतं. पण आता बेरोजगारीबाबतची भीषण परिस्थिती या अहवालाद्वारे समोर आली आहे. बेरोजगारीचा दर ४५ वर्षानंतर इतका वाढला आहे. तेव्हा मोदी यांनाच बेरोजगार करण्याची वेळ आल्याचं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपा आणि मोदींवर निशाणा साधला आहे.


नेटकऱ्यांकडूनही 'मोदी' ट्रोल

एकीकडे विरोधकांकडून बेरोजगारीवरून भाजपाला-मोदी यांना टार्गेट केलं जात असतानाच आता नेटकऱ्यांनाही मोदींना ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. सोशल मीडियावर #HowsTheJobs असा हॅशटॅग चौथ्या क्रमांकावर ट्रेण्ड होत असून नेटकरी यावर तुटून पडले आहेत. या हॅशटॅगच्या माध्यमातून तरूण नोकऱ्यांच काय असा सवाल मोदींना विचारत आहेत. त्यामुळे येत्या काळात बेरोजगारीवरून चांगलाच वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. तर विरोधकांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपा-मोदींना धारेवर धरण्यासाठी मोठा मुद्दाही मिळाला आहे. त्यामुळे निवडणुकीत हा मुद्दा उचलला गेला तर आश्चर्य वाटायला नको.



हेही वाचा -

एकाच वेळी जुळ्या बोगद्यातून दोन टीबीएम मशीन पडल्या बाहेर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा