Advertisement

राणी बागेचे तिकीट वाढणार

महापालिकेच्या तिजोरीवरील वाढता आर्थिक ताण आणि महसूल वाढविण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांचा फटका राणीबागेलाही बसणार आहे.

राणी बागेचे तिकीट वाढणार
SHARES

भायखळ्यातील (byculla) जिजाबाई राष्ट्रीय उद्यान म्हणजेच राणीबागेतील पशुपक्ष्यांची देखभाल, त्यांच्या खाद्याचा खर्च, वैद्यकीय सुविधा तसेच उद्यानातील विविध नवीन प्रकल्पांसाठी वाढत्या खर्चामुळे तिकिट दरात वाढ करण्याचा प्रस्ताव बृहन्मुंबई महानगरपालिका (brihanmumbai municipal corporation) तयार करत आहे.‌

राणीबागेत (rani baugh) पेंग्विन, वाघ-सिंहांसह विविध पशुपक्ष्यांना पाहण्यासाठी दररोज सुमारे 6 ते 7 हजार पर्यटक भेट देतात.

यामध्ये मुंबईसह देश-विदेशातील पर्यटकांचाही मोठा समावेश आहे. मुंबईकरांसह देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या राणीबागेतील सफर आता महागण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या तिजोरीवरील वाढता आर्थिक ताण आणि महसूल वाढविण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांचा फटका राणीबागेलाही बसणार आहे. प्रवेश शुल्कात थेट दुप्पट वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सध्या राणी बागेत लहान मुलांसाठी 25 रुपये, तर प्रौढांसाठी 50 रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते. प्रस्तावित दरानुसार लहान मुलांसाठी 50 रुपये आणि प्रौढांसाठी 100 रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे.

यामुळे कुटुंबासह राणी बागेत फिरण्यासाठी येणाऱ्या मुंबईकरांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.

विशेष म्हणजे, राणीबागेला पर्यटकांचा प्रतिसाद सातत्याने वाढत आहे. 2017 मध्ये पेंग्विन आणल्यानंतर उद्यानाच्या लोकप्रियतेत मोठी भर पडली.

बिबट्या, कोल्हे, तरस, अस्वल यांसह सुमारे 382 प्राणी-पक्षी येथे पाहायला मिळतात. त्यामुळे मुंबईतील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक म्हणून राणीबागेची ओळख निर्माण झाली आहे.

2025-26 या वर्षात तब्बल 25 लाख 42 हजार 135 पर्यटकांनी राणीबागेला भेट दिली. त्यातून महापालिकेला 9 कोटी 85 लाख 87 हजार रुपये महसूल मिळाला.

चालू आर्थिक वर्षात एप्रिल 2026 मध्ये 1 लाख 91 हजार 615 पर्यटकांनी भेट दिली आणि त्यातून 75 लाख 39 हजार रुपये महसूल मिळाला.

मे महिन्यात पर्यटकांची संख्या वाढून 3 लाख 10 हजार 654 झाली, तर महापालिकेच्या तिजोरीत 1 कोटी 20 लाख 41 हजार रुपये जमा झाले. 

राणीबागेचा विस्तार, मुलुंड येथील प्रस्तावित पक्षी उद्यान तसेच मत्स्यालयासारख्या प्रकल्पांमुळे भविष्यात देखभाल आणि संचालनाचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे उपलब्ध स्रोतांमधून महसूल वाढविण्यावर महापालिकेचा भर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मुंबई महापालिकेवर सध्या मोठ्या आर्थिक जबाबदाऱ्यांचा भार आहे. मुंबईत दोन लाख कोटी रुपयांहून अधिक किंमतीची विविध कामे सुरू आहेत.

दुसरीकडे महापालिकेच्या मुदत ठेवींमध्ये घट होत असल्याने भविष्यातील आर्थिक नियोजनाचे आव्हान प्रशासनासमोर आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी विविध विभागांना महसूलवाढीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे.

गेल्या काही वर्षांत महापालिकेवर पशुपक्ष्यांच्या देखभालीचा आर्थिक भार वाढला आहे. प्राण्यांसाठी दर्जेदार खाद्य, पशुवैद्यकीय उपचार, पिंजरे व अधिवासाची देखभाल, स्वच्छता तसेच सुरक्षाव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे.

त्यात राणीबागेत 2017 पासून प्रवेशशुल्कात कोणतीही मोठी वाढ झालेली नाही. त्यामुळे आर्थिक समीकरण जुळवण्यासाठी तिकिट दरात वाढ करण्याचे विचाराधीन असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.



हेही वाचा

मुंबई कोस्टल रोडवर केबल चोरांचा धुमाकूळ

SIR प्रक्रिया रद्द करा; बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, राज ठाकरेंची मागणी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा