जोगेश्वरीच्या पाणीसमस्येवर रवींद्र वायकरांचा उपाय

  Jogeshwari
  जोगेश्वरीच्या पाणीसमस्येवर रवींद्र वायकरांचा उपाय
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक
  मुंबई  -  

  जोगेश्‍वरी - उंच भागांमध्ये कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्याचा प्रश्‍न दूर करण्यासाठी जोगेश्वरीचे आमदार आणि राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी पुढाकार घेतलाय. उंच भागांच्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या बसवण्यात याव्यात, असे निर्देश रविंद्र वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंत्यांना दिले. 

  राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी सोमवारी बैठक बोलावली होती. या बैठकीला मुंबई महानगरपालिकेचे मुख्य जलअभियंता तवाडिया, उप जलअभियंता राठोड, सहाय्यक जलअभियंता साळुंके तसेच जोगेश्‍वरीतील जनता उपस्थित होती. या वेळी रहिवाशांनी विभागात होणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा पाढा महापालिका अभियंत्यांसमोर वाचला. 

  डोंगरावर झोपडपट्‌ट्या असल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार रहिवाशांनी अभियंत्यांकडे केली. त्यामुळे या ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी रहिवाशांनी केली. त्याचबरोबर विभागामध्ये पालिकेने दोन टँकर खरेदी करुन त्याद्वारे पाणी पुरवठा करावा, अशी मागणीही रहिवाशांनी केली. तसेच वेरावली हा जलाशय जीर्ण झाल्याने त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. त्यासाठी आवश्यक त्या निधीची तरतूद करण्यात यावी. शिवटेकडी हा भाग उंचावर असल्याने येथील अनेक ठिकाणी अपुरा पाणी पुरवठा होतो. त्यामुळे येथे जास्त क्षमतेचा पंप बसवण्यात यावा, असे निर्देशही वायकर यांनी जलअभियंता तवाडिया यांना दिले. यावर तवाडीय यांनी सांगितले की, "टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने एक वेबसाईट तयार केली आहे. ज्या भागांना कमी पाणी पुरवठा होत असेल तेथील जनतेने आपली तक्रार या वेबसाईटवर नोंदवल्यास त्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. ज्या उंच भागात राहणाऱ्या रहिवाशांना होणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा प्रश्‍न दूर करण्यासाठी अशा भागातील किमान १५० सभासदांनी एकत्र येऊन पाण्याच्या कनेक्शनसाठी मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज केल्यास अशांना पालिकेतर्फे पाण्याची टाकी बांधून देण्यात येईल," असे आश्‍वासन तवाडिया यांनी दिले. 

  सध्या शिवटेकडी येथे ४० हॉर्स पॉवर क्षमतेच्या पंपाच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु आता येथे ५० हॉर्स पॉवर क्षमतेचा पंप बसवण्यात येणार असल्याने येथील पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होईल, अशी माहितीही तवाडिया यांनी दिली. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.