Advertisement

माहिमच्या पत्थरवाडीतील रहिवासी मूलभूत सुविधांपासून वंचित


माहिमच्या पत्थरवाडीतील रहिवासी मूलभूत सुविधांपासून वंचित
SHARES

देशाची आर्थिक राजधानी असे बिरुद मिरवणाऱ्या मुंबईत नैसर्गिक विधीकरिता शौचालयाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसणे ही अत्यंत क्लेशकारक बाब म्ह्टली पाहिजे. पण हे सत्य आहे. माहिमच्या कॉजवे परिसरात गेल्या 60 वर्षांपासून रहात असलेल्या पत्थर वाडीतील रहिवाशांचे पिण्याचे पाणी आणि शौचालयाच्या सुविधेअभावी सध्या हाल सुरू आहेत. आजही येथील रहिवाशांना उघड्यावर शौचाला जावे लागत आहे. दर निवडणुकीत मतं मागायला येणाऱ्या प्रत्येक राजकारण्याकडे शौचालयाची मागणी करूनही अद्याप येथील रहिवाशांची मागणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे येथील महिला रहिवाशांनी पुढाकार घेत पालिकेविरोधात आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.

पत्थर वाडीत पारधी समाज मोठ्या संख्येने राहतो. वाडीत पिण्याचे पाणी आणि शौचालयाची सोय व्हावी यासाठी अनेकदा येथील रहिवाशांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कार्यालयात खेटे घातले. परंतु ही वाडी कायदेशीररित्या राहण्यास अपात्र असल्याची कारणे देऊन रहिवाशांना गप्प केले जाते.

सध्या वाडीत एकूण 350 रहिवासी राहतात. हा विभाग वॉर्ड क्रमांक 182 मध्ये येत असून शिवसेनेचे नगरसेवक मिलिंद वैद्य, खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर हे येथील लोकप्रतिनिधी आहेत. महापालिकेत शिवसेनेची सत्ता असूनदेखील येथील रहिवाशांना मूलभूत गरजांपासून वंचित ठेवले जाते, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. अखेर सतत पदरी निराशा आल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपल्या समस्यांकडे लक्ष दिले नाही तर जी/ उत्तर विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा पारधी समाजातील महिलांनी दिला आहे.

आमच्याकडे या घराचे आधार कार्ड, वीज बिल, रेशन कार्ड , फोटो पास आणि मतदान ओळखपत्रसुद्धा आहे. या राजकारण्यांना आमची मतं चालतात. निवडणुकीत हात जोडत मत मागायला येणाऱ्या राजकारण्यांना आमच्या समस्या दिसत नाहीत का ? मुंबई शहरात पारधी समाजाएवढी दुर्दशा कुठल्या समाजाची असेल, असे वाटत नाही. आम्हाला हक्काचे शौचालय हवे आहे. महापालिकेने ते बांधून न दिल्यास आम्ही आंदोलन करु.
लक्ष्मी पवार, स्थानिक नागरिक

पावसाळ्यात उघड्यावर शौचाला जाणे अत्यंत त्रासदायक होते. आम्हाला किमान शौचालय बांधून मिळावेत ही आमची अपेक्षा आहे. आमच्याकडे घराचा फोटो पास आहे. पण आम्हाला शौचालय मिळत नाही. आम्ही मतदान करतो. तरीही आमच्या घरापर्यंत यायला पक्का रस्ता नाही. घराच्या आजूबाजूचा परिसर कचऱ्याने वेढलेला आहे. मुंबईसारख्या शहरात आम्हाला एक सार्वजनिक शौचालय मिळू नये ही मोठी शोकांतिका आहे.
बसवंती काळे, स्थानिक नागरिक

1995-2000 दरम्यान कागदोपत्री पात्र असलेल्या झोपड्यांना पाणी आणि सुविधा देण्याचा आम्ही प्रत्न करु. मी आता नगरसेवक झालो आहे. नगरसेवक कालखंडात प्रत्येकाला सोई सुविधा देता येतील याकडे माझे लक्ष राहील.
मिलिंद वैद्य, नगरसेवक, वॉर्ड क्रमांक 182

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा