उन्हाळी सुट्टीत मुलांना खेळण्यासाठी एकही मैदान उपलब्ध नसल्याची स्थिती परळ (पू.) भोईवाड्यात उद्भवली आहे. भोईवाडा येथे स्वातंत्र्य सैनिक कै. सदाकांत ढवण उद्यान हे येथील मुले आणि स्थानिकांसाठी एकमेव उद्यान आहे. मात्र या उद्यानाला सध्या अनेक समस्यांनी ग्रासले आहे. उद्यानातील अनेक खेळणी तुटलेली असल्याने मुलांनी आणि स्थानिक नागरिकांनी या उद्यानाकडे पाठ फिरवली आहे. जी खेळणी तुटलेली आहेत. ती उचलून नेण्याची तसदीदेखील महापालिका घेत नाही.
या उद्यानाला सुरक्षारक्षक असून देखील त्याचा फारसा फायदा होत नाही. या उद्यानात पालिकेमार्फत श्वान फिरवण्यास सक्त मनाई असल्याचा फलक येथे लावण्यात आला आहे. तरी देखील सकाळी आणि सायंकाळी श्वानांसोबत फेरफटका मारण्यासाठी नागरिक येथे येतात. हे श्वान उद्यानातच नैसर्गिक विधी उरकत असल्याने उद्यानात व्यायामासाठी आलेल्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. अशी तक्रार करण्यात आली आहे.
सदरील काम उद्यान विभागाच्या अधिपत्याखाली येते. तरीही या समस्यांची दखल घेऊन पुढील कारवाई केली जाईल.
- विश्वास मोटे, सहाय्यक अभियंता, महापालिका, एफ दक्षिण विभाग
तुटलेल्या खेळण्यामुळे या उद्यानात येणाऱ्या मुलांना इजा होण्याची शक्यता आहे. उद्यानातील आसन व्यवस्थेची स्थिती फारशी चांगली नसून उद्यानात पिण्याच्या पाण्याचा आभाव तसेच शौचालय नसल्यामुळे गैरसोय होत असल्याची तक्रार तेथील स्थानिकांनी केली आहे.