संजय निरुपम यांना महापालिका आपत्कालीन कक्षात 'नो एन्ट्री'

  Mumbai
  संजय निरुपम यांना महापालिका आपत्कालीन कक्षात 'नो एन्ट्री'
  मुंबई  -  

  मुंबई महापालिकेचा 'आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष' मान्सूनपूर्व तयारी कशा पद्धतीने करत आहे? नाल्यातील गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांची माहिती 'व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम'द्वारे कशी घेतली जात आहे? यासंदर्भातील कामकाज पाहण्याची इच्छा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी प्रकट केली होती. परंतु सुरक्षा रक्षकांनी आपत्कालीन कक्षात जाण्यापासून रोखल्याने निरुपम यांनी ही इच्छा अपूर्णच राहिली.

  मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी परवानगी नाकारल्यामुळे सुरक्षा रक्षकांसह कक्षाचे प्रमुख अधिकारी महेश नार्वेकर यांनी निरुपम यांना कक्षात प्रवेश दिला नाही. आजवर शिवसेनेच्या नेत्यांसह भाजपाच्या नेत्यांना तसेच मंत्र्यांना या कक्षाची सैर करून आणणाऱ्या आयुक्तांना निरुपम यांचे वावडे असल्यामुळेच त्यांनी हा कक्ष अतिसंवेदनशील असल्याचे कारण देत निरुपम यांना प्रवेश नाकारल्याचे म्हटले जात आहे.

  महापालिकेतील आपत्कालीन कक्षाने मान्सूनपूर्व तयारी केल्याची माहिती मिळाल्यानंतर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासह कक्षाची पाहणी करण्याची इच्छा प्रकट केली होती. परंतु महापालिका आयुक्तांनी विरोधी पक्षनेते वगळता निरुपम यांना कक्षात प्रवेश देता येणार नाही, असे त्यांना लेखी स्वरुपात कळवले. आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्ष अतिसंवेदनशील असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बाहेरच्या माणसांना प्रवेश देता येणार नाही, असे पत्रात म्हटले आहे.

  मात्र, आयुक्तांनी प्रवेश नाकारल्यानंतरही विराेधी पक्षनेत्यांसह निरुपम यांनी कक्षात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र निरुपम विरोधी पक्षनेत्यांसह तेथे गेले असता निरुपम यांना सुरक्षा रक्षकांनी रोखले. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार निरुपम यांना प्रवेश नाकारल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे रवी राजा यांनीही कक्षात न जाता प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

  नालेसफाईची पाहणी केल्यानंतर कक्षाच्या मान्सूनपूर्व तयारीची आपण माहिती घेणार होतो. तसेच गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांची(व्हेईकल ट्रॅकींग सिस्टीमी देखरेखही इथेच होते, अशी माहिती मिळाल्याने मी त्यांचीही पाहणी करणार होतो. परंतु प्रशासनाच्या मनात चोरी आहे. त्यांनी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे हा प्रकार उघडकीस येईल, या भितीमुळे त्यांनी आपल्याला प्रवेश नाकारल्याचे निरुपम यांनी सांगितले.

  हे आपत्कालीन कक्ष असले तरी मुंबईकर सुरक्षित नाही. महापालिकेकडे कोणत्याही उपाययोजना नाहीत. त्यामुळे मुंबईकरांना हा पावसाळा देवाच्या भरवशावरच काढावा लागणार आहे. महापालिका मुंबईकरांना वाचवू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.