Advertisement

योग्य उपचार न मिळाल्याने गेला अर्णवचा जीव, कुटुंबियांचा आरोप


योग्य उपचार न मिळाल्याने गेला अर्णवचा जीव, कुटुंबियांचा आरोप
SHARES

आपल्या आजोबांच्या घरी खोपोलीला रहायला गेलेल्या ७ वर्षीय अर्णव सुर्वेचा कुत्र्याने चावा घेतल्यानंतर वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. तपासणी तर सोडा त्याला रुग्णालयात दाखल देखील करुन घेतलं नाही, असा आरोप सुर्वे कुटुंबियांनी केला आहे.

२६ डिसेंबर २൦१७ रोजी अर्णव आपल्या आजोबांच्या घरी गेला होता. यादरम्यान पिसाळलेल्या कुत्र्याने अर्णवच्या गालाचा चावा घेतला. अर्णवसह आणखी ४ ते ५ जणांना कुत्र्याने चावा घेतला होता. कुत्रा चावल्याच्या गंभीर जखमा अर्णवच्या चेहऱ्यावर होत्या. त्याला तात्काळ तिथल्या रहिवाशांनी खोपोलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्याला कुटुंबियांनी ठाण्याच्या समर्थन नर्सिंग होममध्ये दाखल केलं. तिथे त्याला टीटीचे ४ इंजेक्शन्स देण्यात आले. त्यानंतर त्याची प्रकृती स्थिर झाली होती.


प्रकृती पुन्हा बिघडली -

पण, १४ जानेवारीला त्याला पुन्हा ताप आला. म्हणून त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल केलं. यावेळी खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला टॉनसन्स झालं असल्याचं सांगितलं. तिथे त्याची प्रकृती आणखी बिघडली. म्हणून मग, कुटुंबियांनी मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. पण, फोर्टीस रुग्णालयाला जेव्हा त्याला कुत्रा चावला असल्याचं सांगितलं तेव्हा डॉक्टरांनी त्याला उपचार द्यायला नकार दिला. शेवटी, त्यांनी फोर्टिसमधून अर्णवला कस्तुरबाला नेण्याचा सल्ला दिला.


टेस्ट न करताच केलं आजाराचं निदान -

कस्तुरबा रुग्णालयाने अर्णवची तपासणी न करता त्याला रेबीज झाला असल्याचं सांगितलं. तसंच रेबीजवर कुठलीही उपचार सुविधा रुग्णालयात उपलब्ध नसल्याचं सांगत थेट नायर रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. शेवटी अर्णवच्या कुटुंबाने त्याला तात्काळ नायर रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. पण, नायर रुग्णालयातूनही त्याला दाखल करुन घेण्यास नकार देण्यात आला. रात्री १.३൦ ते पहाटे ४ वाजेपर्यंत अर्णव रुग्णवाहिकेतच होता.
त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यानंतर नायर रुग्णालयात असलेल्या डॉक्टरांनी अर्णवला रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी अर्णवला तत्काळ आयसीयूमध्ये दाखल केलं. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं. त्याला काही इंजेक्शन्सही दिले. पण, पुढच्या काही मिनिटांतच अर्णवचा मृत्यू झाल्याचं नायर रुग्णालयाने त्याच्या कुटुंबियांना सांगितलं.

डॉक्टरांनी उपचार, तपासणी न करताच त्याला रेबीज झाल्याचं सांंगितलं. शिवाय, अर्णवला रेबीजसारखी कुठलीही लक्षण नसताना त्याला रेबीज झाल्याचं सांगितलं. त्याच्या मृत्यूचं कारण फुप्फुसाला सूज आणि रेबीजचं इन्फेक्शन असल्याचं सांगितलं आहे. पण, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तपासणी न करताच परत पाठवलं याचं जास्त दु:ख होत आहे.
मनोज सुर्वे, अर्णव सुर्वेचे काका


रेबीजच्या केसमध्ये शवविच्छेदन केलं जात नाही. त्याच्यावर आम्ही सर्व उपचार केले. पण, असा एका छोट्या मुलाचा रेबीजमुळे जीव जाणं हे अत्यंत वाईट आहे. रेबीज होऊन वाचलेल्यांपैकी संपूर्ण भारतात फक्त ५, ६ केसेस सापडतील.

- डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, नायर रुग्णालय


काय आहे रेबीज?

रेबीज हा उष्ण रक्ताचे प्राणी, जसं कुत्रा, ससा, माकड, मांजर इत्यादी चावल्यानंतर होणारा रोग आहे. या रोगात रोगी पाण्याला घाबरतो. रेबीज हा रोग झाल्यास तो प्राणघातक आहे. मात्र, रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येतं. रेबीज हा रोग कुत्र्यांनाही होतो. हा कुत्र्यांमुळे माणसात पसरणारा रोग आहे.


रेबीजची लक्षणे -

कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे ९० ते १७५ दिवसात दिसू लागतात. साधारणपणे २ ते १२ आठवडे ताप आणि तापाची लक्षणे दिसून येतात. मानसिक त्रास, निद्रानाश, भास होणे, सामान्य माणसासारखे न वागणे, अतिशयोक्ती करत वागणे अशी लक्षणे रोग्यात दिसून येतात. रेबीज झालेल्या माणसाला पाण्याची खूपच भीती वाटते. रेबीज झालेल्या माणसाचा घसा पूर्णपणे खरवडून निघतो आणि जेव्हा तो माणूस काही बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा घसा खरवडलेला असल्यामुळे कुत्र्याच्या भुंकण्याप्रमाणे आवाज येतो.


२०१७ या वर्षात २४ हजार कुत्र्यांची केली नसबंदी

महापालिकेच्या श्वान पथकाने २൦१७ या वर्षात २४ हजार कुत्र्यांची नसबंदी करून लसीकरण केलं आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कुत्रा चावलेल्या व्यक्तीसाठी अँटी वॅसिनेशन उपलब्ध असतात. ज्यामुळे कुत्रा चावलेल्या व्यक्तीला ते दिल्यानंतर बरं वाटू शकतं, अशी माहिती महापालिकेतील श्वान विभागाचे डॉ. शेट्ये यांनी दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा