रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाच क्षय रोगाची लागण

  Sewri
  रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाच क्षय रोगाची लागण
  मुंबई  -  

  शिवडी पश्चिम येथील क्षय रुग्णालयात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. परंतु त्यांची सेवा करता करता येथील कर्मचारी वर्गाला क्षय रोगाची लागण होत असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. रोजंदारी कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या शिवानंद पोते या कर्मचारी रुग्णाचा मंगळवारी मृत्यू झाला आहे. परंतु हा कर्मचारी रोजंदारीवर कार्यरत असल्याने त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबियांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळेल का? असा सवाल कंत्राटी कर्मचारी वर्गामधून व्यक्त होत आहे.

  शिवडीतील क्षय रुग्णालयात 1 हजार 200 रुग्ण उपचार घेऊ शकतील इतकी क्षमता आहे. सध्या रुग्णालयात 800 रुग्ण दाखल आहेत. या रुग्णांच्या सेवेसाठी 80 डॉक्टर, 220 परिचारिका, 170 सफाई कामगार आणि 165 वॉर्ड बॉय आहेत. परंतु यातील अनेक कर्मचारी विविध कारणांनी रजेवर असल्याने रोज किमान दोनशे ते सव्वादोनशे कर्मचारी वर्ग रुग्णांच्या सेवेसाठी कमी पडत असल्याचे येथील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. तर अनेक कर्मचाऱ्यांना क्षयरोगाची लागण झाल्याने ते रजा मागतात. पण रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी कर्मचारी वर्ग कमी पडत असल्याने या कर्मचारी रुग्णांना रजा देण्यात येत नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती जास्त प्रमाणात ढासळत आहे. 2005 सालापासून 2017 एप्रिलपर्यंत क्षय रोगाची लागण होऊन 52 कर्मचारी रुग्ण दगावले आहेत. त्यापैकी एक कर्मचारी रुग्ण शिवानंद पोते याचा मंगळवारी एमडीआर क्षयाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याचबरोबर रुग्णालयातील अन्य चार जण रोजंदार कामगार सध्या एमडीआर क्षयाचे उपचार घेत आहेत. तर 60 कर्मचाऱ्यांना घरी बसवण्यात आले असल्याचे येथील कर्मचारी सांगतात.

  प्रशासनाच्या वतीने कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत नाही. मनुष्यबळाअभावी सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जादा वेळ काम करावे लागते. त्यात रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना क्षयाची लागण झाल्यानंतर रजा देण्यात येत नाही. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांपैकी एकाला तरी सेवा सुविधा देऊन महापालिका सेवेत समावेश करून घ्यावे 

  - डॉ. प्रदीप नारकर, चिटणीस, म्युनिसिपल मजदूर युनियन

  शिवडी क्षय रुग्णालयात 2010 सालापासून 106 कर्मचाऱ्यांना रोजंदारी तत्वावर घेण्यात आले आहे. यात कक्ष परिचर, हमाल, आया या पदावर हे कर्मचारी काम करीत आहेत. सध्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना 550 रुपये इतकी रोजंदारी देण्यात येत आहे. 62 रोजंदारी कामगार क्षयरोग रुग्णालयातील कायम सेवानिवृत्त आणि सेवेत असलेल्या कामगारांचे पाल्य आहेत. या रोजंदारी कामगारांना कोणतीही वैद्यकीय सेवा किंवा क्षयरोग विरोधी संरक्षणार्थ साहित्य पुरवले जात नाही. क्षयाची भीती असतानाही रोजंदारीवर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी युनियनकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची हालचाल प्रशासनाने कामगारांच्या सुरक्षेसाठी केलेली नाही.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.