नाले भरले तुडूंब,पालिका प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

Dharavi
नाले भरले तुडूंब,पालिका प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष
नाले भरले तुडूंब,पालिका प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष
नाले भरले तुडूंब,पालिका प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष
See all
मुंबई  -  

शाहूनगर येथील मुख्य नाल्याची खूपच दुरवस्था झाली आहे. मुंबईतील मुख्य नाल्यांपैकी एक असलेल्या या नाल्याची दोन्ही बाजूची भिंत कोसळली असून, दोन्ही बाजूस लोकवस्ती असल्याने या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना धोका निर्माण झाला आहे. लहान मुले नेहमी या नाल्याच्या आसपास खेळत असतात. त्यामुळे कधीही ही मूलं नाल्यात पडून अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

60 फूट रोडच्या लगतची नाल्याची भिंत देखील कोसळलेली आहे. रस्ता सततचा रहदारीचा असल्याने वाहनांची वर्दळ या रस्त्यावर सतत असते. अनेकदा या ठिकाणी रात्रीच्यावेळी अपघात घडण्याची शक्यता असते आणि याच मुख्य नाल्याला जोडणारा आझादनगर डी वॉर्ड नाला देखील कचऱ्याने तुडुंब भरला आहे. यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच जमलेला आहे.

आझादनगर नाल्यालगत राहणाऱ्या जायदा शेख सांगतात, 'या घाणीचा आम्हाला वर्षभर त्रास सहन करावा लागतो. घाणीमुळे आणि आता तर नाला इतका तुंबला आहे की, यावरून सहज चालत इकडून तिकडे जाता येऊ शकते. शिवाय या नाल्याला गेली अनेक वर्षे संरक्षण भिंतच नसल्यामुळे लहान मूलं खेळताना सहज या नाल्यात पडू शकतात". नालेसफाई वेळेत झाली नाही तर पावसाळ्यात सर्वांच्या घरात पाणी शिरेल आणि या ठिकाणी रहाणे मुश्कील होईल. नाल्यातून गेलेल्या पाण्याच्या पाईप लाईनमध्ये देखील नाल्याचे पाणी बऱ्याच वेळा शिरते. पण या सर्व समस्येकडे मात्र पालिका दुर्लक्ष करत असल्याची तक्रार शेख यांनी केली आहे.

शाहूनगर नाल्यालगत बर्फाचा गोळा विकणारे अहमद अन्सारी जिथे भिंत कोसळली आहे तिथेच आपला गाडा लावतात. त्यांनी सांगितले की, गेले चार-पाच महिने झाले भिंत कोसळून. हळूहळू सर्व ठिकाणची भिंत कोसळू लागली आहे.

शाहूनगर नाल्याच्या कोपऱ्यावर फळांचा ज्यूस विक्रेते रामनारायण यादव हे खूप वर्षांपासून इथे व्यवसाय करतात. पोटाची खळगी भरण्यासाठी आम्ही इथे ज्यूस विक्री करतो आणि नाल्याची सफाई दरवर्षी होत असते पण यावर्षी अजून सुरुवात झाली नाही. शिवाय नाल्याच्या भिंती कमकुवत झाल्याने पडझड होत आहे. नाल्याच्या आतील बाजूस झाडे वाढली असून, त्याची छाटणी करण गरजेचं आहे आणि रस्त्यालगत कोसळलेल्या भिंतीची दुरुस्ती देखील करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.

नालेसफाई आणि डागडुजी कधी होणार या विषयावर जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त रमाकांत बिरादार यांना विचारले असता त्यांनी एप्रिल अखेरीस विभागातील नालेसफाईला सुरुवात होणार असल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे आझादनगर तसेच शाहूनगर नाल्यांच्या सफाईनंतर संरक्षण भिंतीचे काम देखील करण्यात येणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.