Advertisement

अवमानप्रकरणी महापौर, सभागृनेत्यांनी आयुक्तांपुढे घातलं शेपूट


अवमानप्रकरणी महापौर, सभागृनेत्यांनी आयुक्तांपुढे घातलं शेपूट
SHARES

मुंबई महापालिकेच्या विकास आराखड्याची माहिती देणाऱ्या देशातील पहिल्या मोबाईल अॅपचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. मात्र या उद्घाटन कार्यक्रमात महापौरांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. हा एकप्रकारे महापौर आणि महापालिका सभागृहाचा अवमान असल्याचा आरोप करत शिवसेना महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याविरोधात आक्रमक झाली. त्यासाठी शिवसेनेच्या रणरागिणींनी आयुक्तांना सभागृहात येण्यास मजबूर केलं. परंतु आयुक्तांनी आपलं प्रशासकीय कौशल्य दाखवून नगरसेवकांना गुंडाळत या अवमानप्रकरणी दिलगिरी व्यक्त करण्यास नकार दिला. मात्र आयुक्तांच्या या भूमिकेवर महापौर आणि सभागृहनेत्यांनी नमतं घेतल्याने आक्रमक झालेल्या रणरागिणींसह शिवसेनेचे नगरसेवकांमध्ये महापौरांसह सभागृहनेत्यांविरोधात तीव्र नाराजी पसरली आहे.


काय आहे प्रकरण?

मुंबई महापालिकेच्या ‘mcgm 24 बाय 7’ हे मोबाईल अॅप आणि ‘one mcgm gis’ या संकेतस्थळाचं उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमास महापौर तसेच नगरसेवक उपस्थित असणं आवश्यक होतं. परंतु त्याची साधी माहितीही महापौरांना देण्यात आली नव्हती. हा एकप्रकारे महापौरांचा तसेच सभागृहाचा अवमान असल्याचं सांगत सभागृहनेते यशवंत जाधव यांनी आयुक्तांच्या या मनमानी कारभाराचा तीव्र निषेध व्यक्त केला. त्याला विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव, सपाचे गटनेते रईस शेख यांनी पाठिंबा दिला.


अविश्वास प्रस्तावाची मागणी

महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचा प्रशासनावर अंकुश राहिला नसून फक्त निषेध करण्यापेक्षा आयुक्तांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणा, असं विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी सांगितलं. सत्तेचं विक्रेंदीकरण करता करता आता केंद्रीकरण चालल्याचा आरोप करत अजोय मेहता यांच्यासारख्या शिस्तप्रिय अधिकाऱ्यांकडून आपल्याला खूप अपेक्षा असल्याची खंतही नगरसेवकांनी व्यक्त केली.


निषेध आणि अभिनंदन

महापालिकेचं देशातील पहिले हे अॅप असताना, महापौर तसेच नगरसेवकांना या कार्यक्रमाची कल्पना देणं आवश्यक असल्याचं नगरसेवकांनी सूचित केलं. या चर्चेत अनिल पाटणकर, राजुल पटेल, किशोरी पेडणेकर, अनिल कोकीळ, बाळा नर, अश्रफ आझमी, सुफियान वणू, कप्तान मलिक आदींनी भाग घेत प्रशासनाचा निषेध केला. तर भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनी या अॅपचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांचे हस्ते केल्यामुळे प्रशासनाचं अभिनंदन केलं.


म्हणून केलं उद्घाटन...

प्रशासनाचं सर्व कामकाज सभागृहाच्या नियंत्रणाखालीच चालतं. ६ डिसेंबरला सह्याद्री अतिथीगृहावरील विकास आराखडा बैठकीत हे अॅप व संकेतस्थळ बनवल्याची माहिती आपण मुख्यमंत्र्यांना दिली होती. त्यावेळी त्यांनी हे अॅप आणि संकेतस्थळ त्वरीत लोकांना खुलं करून देण्याची सूचना केली. त्यामुळे तिथंच या योजनांचं उद्घाटन केल्याचं अजोय मेहता यांनी सांगितलं. विकास आराखडा सध्या राज्य सरकारकडे मंजुरीला आला असून नगरविकास खात्याच्या अखत्यारित तो येतो. त्यामुळे विकास आराखडा ही सरकारची मालमत्ता असल्यामुळे तसेच नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून मुख्यंत्र्यांच्या हस्ते या योजनांचं शुभारंभ केल्याचं ते म्हणाले.


माफी मागण्यास असमर्थतता

ज्या पद्धतीने महापालिका आयुक्तांनी हे उद्घाटन उरकून घेतलं, त्याला विरोध दर्शवत आयुक्तांनी दिलगिरी व्यक्त करावी म्हणून शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक झाले होते. परंतु आयुक्तांनी गोल गोल उत्तर देत माफी मागण्यास असमर्थता दर्शवली. अखेर निवेदनातील शेवटची ओळ वाचत आमच्याकडून कोणताही अवमान झाला नसल्याचं त्यांनी सांगितलं.


नगरसेवकांकडून निषेध

त्यामुळे नगरसेवक अधिकच आक्रमक झाले आणि त्यांनी आयुक्त हाय हाय… महापालिका माफी मागा…अशा घोषणा देत सभागृहनेते दणाणून सोडले. परंतु त्यानंतरही आयुक्तांनी दिलगिरी व्यक्त करण्यास नकार दिला. यानंतर आयुक्त अडचणीत सापडलेले असताना महापौरांनी, यापुढे सभागृहाचा अवमान होता कामा नये, अशी सूचना करत त्यांना पूर्णपणे संरक्षण दिलं आणि त्यानंतर सभागृहनेत्यांनीही नरमाईची भूमिका घेत शेपटी घातल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहातून बाहेर पडत या दोघांचा तीव्र निषेध नोंदवला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा