Advertisement

दिलासादायक! मुंबईच्या 'या' भागातील रुग्णसंख्येत लक्षणीय घट

दुसऱ्या लाटेत झपाट्यानं संक्रमित होत असलेल्या उत्तर मुंबईतील भागांत गेल्या आठवडाभरापासून रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे.

दिलासादायक! मुंबईच्या 'या' भागातील रुग्णसंख्येत लक्षणीय घट
SHARES

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. राज्यात दुसरी लाट आल्याचं राज्य सरकार स्पष्ट केलं. शिवाय, मुंबईतील अनेक भाग हे कोरोनाचा हॉटस्पॉट बनले होते. मात्र असं असलं तरी मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. दुसऱ्या लाटेत झपाट्यानं संक्रमित होत असलेल्या उत्तर मुंबईतील भागांत गेल्या आठवडाभरापासून रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. उत्तर मुंबईमध्ये आतापर्यंत ९१ हजार ३८९ जणांना करोनाची बाधा झाली असून त्यापैकी ७३ हजार २६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १ हजार ६१७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्यस्थितीत या भागातील १६ हजार ५०३ रुग्ण उपचार घेत आहेत.

मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या चाचण्या, बाधित रुग्णांची विलगीकरणात केलेली रवानगी आदी विविध कारणांमुळं रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याचा दावा पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. कांदिवली, बोरिवली आणि दहिसर परिसरांत करोनाबाधितांच्या संख्येत १० टक्क्यांची घट झाल्याचं निदर्शनास आलं आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून अचानक रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू झाली आणि मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचं थैमान सुरू झालं. यामध्ये उत्तर मुंबईमधील कांदिवली, बोरिवली, दहिसर हे भाग आघाडीवर होते.

त्यावेळी महापालिकेनं या परिसरांतील कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी पावले उचलली. या परिसरात सर्वेक्षणावर भर देण्यात आला. सोसायट्यांमध्ये चाचणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं. व्यापक प्रमाणावर चाचण्या करून बाधित रुग्णांचा शोध सुरू करण्यात आला. बाधित रुग्णांना वेळीच विलगीकरणात ठेवण्यात आले. परिणामी, रुग्णसंख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे.

उत्तर मुंबईत झोपडपट्ट्यांची संख्या मोठी आहे. मात्र झोपडपट्ट्यांऐवजी इमारतींमध्ये मोठ्या संख्येनं रुग्ण सापडत असल्याचं निदर्शनास आलं आहे. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ९२.२८ टक्के रुग्ण इमारतींमधील असल्याचं आढळलं आहे. उर्वरित रुग्ण झोपडपट्ट्या आणि चाळीतील आहेत. बाधित रुग्ण सापडल्यामुळं या भागातील ४२ ठिकाणं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली असून, १०८ इमारती सील करण्यात आल्या आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा