Advertisement

महिला मतदार वाढवण्यासाठी मुंबईत विशेष मोहीम


महिला मतदार वाढवण्यासाठी मुंबईत विशेष मोहीम
SHARES

मतदार यादीत महिला मतदारांचं प्रमाण कमी आहे. महिलांमध्ये मतदानाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने 8 मार्चला म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. मुंबई जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी संपदा मेहता यांनी ही माहिती दिली आहे.


मुंबईत 1000 मागे 821 स्त्री मतदार

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसर 1 जानेवारी 2018 या अर्हता दिनांकावर आधारीत अंतिम मतदार यादी 10 जानेवारी 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार मुंबई शहर आणि जिल्ह्यात एकूण 24 लाख 53 हजार 102 मतदार आहेत. त्यामध्ये 13 लाख 46 हजार 904 पुरुष आणि 11 लाख 6 हजार 94 स्त्री मतदार आहेत. या यादीमधील आकडेवारीनुसार मुंबई शहर जिल्ह्यामध्ये 1 हजार पुरुषांमागे 821 स्त्री मतदारांची नोंद आहे.


मतदार जनजागृतीसाठी कार्यक्रम

मतदार यादीत नाव न नोंदवलेल्या महिलांचं मतदार यादीत नाव नोंदवून यादीमध्ये महिलांचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने मुंबई शहर जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची आणि हळदी कुंकू आदी कार्यक्रमातून महिला मतदार जनजागृती करण्यात येईल. नव्याने मतदार यादीत नोंदणी केलेल्या स्त्री मतदारांना ओळखपत्राचे वाटपही यावेळी करण्यात येईल.


नाव नोंदणीसाठी काय करावं?

महिलांनी आपलं नाव मतदार यादीत आहे अथवा नाही याची खात्री ceo.maharashtra. gov.in या संकेतस्थळावर जाऊन करावी. मुंबई शहरात सर्वसाधारण रहिवासी असलेल्या आणि 1 जानेवारी 2018 रोजी 18 वर्षे पूर्ण झालेल्या आणि अद्यापपर्यंत मतदार यादीत नाव नोंदवले नाही अशा सर्व महिलांनी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईनद्वारे किंवा नमुना 6 भरून जवळील विधानसभा मतदार संघाच्या कार्यालयात जमा करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संपदा मेहता यांनी केलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा