Advertisement

चिमुकलीवर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद होणार

युनिट क्रमांक १५ येथे बिबट्या हल्ल्यात दीड वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला.

चिमुकलीवर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद होणार
SHARES

गोरेगावमधील आरे दुग्ध वसाहतीतील युनिट क्रमांक १५ येथे बिबट्या हल्ल्यात दीड वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला. हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.

त्यानुसार युनिट १५ च्या परिसरात दोन पिंजरे लावण्यात येणार असून यासंबंधी लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. त्याच वेळी बिबट्याच्या हालचाली टीपण्यासाठी या परिसरात २२ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी १२ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. उर्वरित १० कॅमेरे लवकरच बसविण्यात येणार आहेत.

आरेतील युनिट १५ मध्ये सोमवारी दीड वर्षांची मुलगी इतिका लोट हिच्यावर बिबट्याने हल्ला केला आणि या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. दिवाळीनिमित्त मंदिरात दिवे लावण्यासाठी इतिकाची आई सोमवारी सकाळी सहा – साडेसहाच्या सुमारास जात होती. तिच्या मागोमाग इतिकाही गेली.

झाडीत लपलेल्या बिबट्याने इतिकावर झडप घातली आणि तिला ओढत दूर नेले. कुटुंबिय आणि रहिवाशांनी इतिकाची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली आणि तिला तात्काळ सेवन हिल्स रूग्णालयात नेले. मात्र डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर आरे परिसरात शोककळा पसरली आहे.

बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी रहिवाशांनी वनविभागाकडे केली आहे. रहिवाशांची  मागणी लक्षात घेऊन बिबट्याला जेरबंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उप वन संरक्षक, ठाणे, संतोष सस्ते यांनी दिली.संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा