Advertisement

गणपती विसर्जना दरम्यान हे ९ नियम पाळावेच लागणार

देशात कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती पाहता पालिकेने ही नियमावली जाहिर केली आहे.

गणपती विसर्जना दरम्यान हे ९ नियम पाळावेच लागणार
SHARES

कोविड-१९ साथ रोगाच्‍या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्‍या संसर्गजन्‍य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्‍सव अत्‍यंत साध्‍या पद्धतीने साजरा करण्‍याबाबतचे आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिका व शासनस्‍तरावरुन वेळोवेळी नागरिकांना करण्‍यात आलं आहे. या अनुषंगाने बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी गणेशोत्‍सव - २०२० साजरा करताना विसर्जनादरम्‍यान पालन करावयाच्‍या आवश्‍यक सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

- घरगुती गणेशोत्‍सव साजरा करणा-या भाविकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन शक्‍यतो घरच्‍या-घरी बादलीत किंवा ड्रममध्‍ये करावे.

- मुंबई शहरात एकूण ७० नैसर्गिक विसर्जन स्‍थळे आहेत. या नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर नागरिकांना किंवा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांना थेट पाण्‍यात जावून मूर्ती विसर्जन करण्‍यास प्रतिबंध आहे.

- नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर महापालिकेद्वारे अतिरिक्‍त मनुष्‍यबळ देवून मूर्ती संकलनाची शिस्‍तबद्ध व्‍यवस्‍था उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे.

- नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवरील गर्दी कमी होण्‍यासाठी महापालिकेच्‍या २४ विभागांमध्‍ये सुमारे १७० कृत्रिम तलावदेखील निर्माण करण्‍यात आले आहेत. कृत्रिम तलावालगत राहणा-या भाविकांना नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर जाण्‍यास मनाई असल्‍याने सदर कृत्रिम तलावाचा वापर लगतच्‍या भाविकांनी करणे बंधनकारक आहे.

- महापालिकेच्‍या प्रत्‍येक विभागांतर्गत ७ ते ८ गणेशमूर्ती संकलन केंद्रे निर्माण करण्‍यात आली आहेत. त्‍याची माहिती तसेच कृत्रिम तलावांची माहिती पत्‍त्‍यासह तसेच गुगल लोकेशनसह महापालिकेच्‍या https://portal.mcgm.gov.in या संकेत स्‍थळावर उपलब्‍ध आहे.

- प्रतिबंधित क्षेत्र (containment zone) मध्‍ये असणा-या सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाच्‍या मूर्तीचे विसर्जन मंडपातच करावयाचे आहे किंवा विसर्जन पुढे ढकलावयाचे आहे. सिल्‍ड इमारतींमधील (sealed building) गणेशमूर्तीचे विसर्जनासाठी घरीच व्‍यवस्‍था करावयाची आहे, याची कृपया नोंद घ्‍यावी.

- मूर्ती संकलन केंद्रावर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर उपलब्‍ध महापालिकेच्‍या व्‍यवस्‍थापनाकडे मूर्ती सुपूर्द करण्‍यापूर्वी मूर्तीची यथासांग पूजा व आरती घरीच किंवा मंडळाच्‍या मंडपातच करुन घेणे बंधनकारक आहे.

- महापालिकेने विशेष व्‍यवस्‍था म्‍हणून ट्रकवर टाक्‍या किंवा इतर व्‍यवस्‍था करुन फिरती विसर्जन स्‍थळे (mobile spots on wheel) निर्माण केलेली आहेत, त्‍याचाही लाभ भाविकांनी घ्‍यावा.

- २०२० गणेशोत्‍सवा दरम्‍यान कोणत्‍याही मिरवणुकीस परवानगी नाही, याची देखील भाविकांनी नोंद घ्‍यावी.

- विसर्जना दरम्‍यान सामाजिक दूरीकरण अंतर (social distancing), मास्‍क/मुखपट्टी, सॅनिटायझर वापरणे इत्‍यादी आरोग्‍य संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असं आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे करण्‍यात आलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा