Advertisement

मुंबईतील जलाशयातील पाणीपातळीत वाढ

धरणक्षेत्रात सतत बरसणाऱ्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत असली तरी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात एल निनोचा प्रभाव अधिक असणार आहे.

मुंबईतील जलाशयातील पाणीपातळीत वाढ
SHARES

मुंबईला (mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 12.44 टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

सतत बरसणाऱ्या पावसामुळे धरणातील (dams) पाणीसाठा 41.36 टक्क्यांवर पोहोचला आहे.

धरणक्षेत्रात सतत बरसणाऱ्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत (water storage) वाढ होत असली तरी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात एल निनोचा प्रभाव अधिक असणार आहे.

तसेच त्यामुळे धरणक्षेत्रात किती पाऊस बरसतो, हे सांगणे कठीण असल्याने चिंता कायम आहे.

दरम्यान, अप्पर वैतरणातून राखीव पाणीसाठा 22 जूनपासून घेण्यास सुरुवात केली होती. मात्र धरणक्षेत्रात बरसत असलेल्या पावसामुळे 6 जुलैपासून राखीव पाणीसाठा घेणे बंद केले आहे.

मुंबई व परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणक्षेत्रात पावसाने जोरदार बॅटिंगला सुरुवात केली आहे.

तसेच त्यामुळे 6 टक्क्यांपर्यंत घसरलेल्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे पालघर, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यात येत आहे.

तिन्ही जिल्ह्यांत सध्या मुसळधार पाऊस बरसत आहे. धरणक्षेत्रात असाच पाऊस बरसत राहिला तर धरणातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होईल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त केला.

मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज 4,100 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो.

तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाणी साठ्याची गरज भासते.

सध्या सातही धरणात 8 जुलै रोजी 5 लाख 98 हजार 589 दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध आहे.

विहार तलावापाठोपाठ तुळशी तलावही मंगळवारी रात्री 11.43 वाजता ओव्हरफ्लो झाला.

मुंबईत होत असलेल्या दमदार पावसामुळे मंगळवारी 7 जुलैच्या रात्री 9 वाजता ‘विहार’ तलाव ओसंडून वाहू लागला आणि त्यापाठोपाठ लगेचच रात्री 11 वाजून 43 मिनिटांनी ‘तुळशी’ तलावदेखील पूर्णपणे भरला.

तुळशी तलाव हा गेल्या वर्षी 16 ऑगस्ट 2025 रोजी भरून वाहू लागला होता. तर 2024 मध्ये हा तलाव 4 ऑगस्ट रोजी भरून वाहू लागला होता. 804.6 कोटी लीटर उपयुक्‍त जलधारणा क्षमता या तलावाची आहे.



हेही वाचा

मुंबई: चिरफाड न करता शवविच्छेदन करता येणार

नायगाव बीडीडी पुनर्विकसित इमारतींमध्ये पाणीटंचाई

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा