Advertisement

BMC Election 2022 यंदाच्या पावसाळ्यापूर्वी नाले सफाईचा प्रश्न सुटणार?

या रोजच्या धावपळीच्या जीवनात मुंबईकरांना रस्त्यांवरील खड्डे, न झालेली नालेसफाई, वाहतूककोंडी, पाण्याचा प्रश्न अशा विविध समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळं मुंबईकरांच्या समस्या नेमक्या कधी सुटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

BMC Election 2022 यंदाच्या पावसाळ्यापूर्वी नाले सफाईचा प्रश्न सुटणार?
SHARES

मुंबई महापालिका निवडणूक दर ५ वर्षाला होते असते. या निवडणुकीमध्ये नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी नगरसेवक निवडून दिले जातात. त्यानंतर महापालिकेची सत्ता पुढील ५ वर्षांसाठी या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या हातात असते. मुंबई महापालिकाअंतर्गत आतापर्यंत बरेच नगरसेवक निवडणून आले. मुंबईकरांनी ''आपल्या समस्या यवर्षी संपणार'' या आशेने या नगरसेवकांना निवडून दिलं. पण समस्या सोडवणं तर लांबच राहिलं, बघायला गेलं तर परिस्थिती अद्याप 'जशीच्या तशीच' आहे.

तसं बघायला गेलं तर बऱ्याच समस्यांना मुंबईकरांना तोंड द्यावं लागतं. परंतू, यातील मुळ आणि मोठी समस्या म्हणजे ''न झालेली नालेसफाई''. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते. मुसळधार पाऊस झाल्यास मुंबईचे रस्ते जलमय होतात. रस्ते जलमय झाल्यानं मुंबईच्या वाहतुकीला ब्रेक लागतो. त्यामुळं जनजीवनही विस्कळीत होते.

मुंबईत मुसळधार पाऊस पडल्यास हिंदमाता, भायखळा, सायन, कुर्ला, दादर, माटुंगा, किंग सर्कल, मिलन सब-वे (सांताक्रूझ), अंधेरी, बोरिवली यांसारख्या अनेक भागांत पाणी साचतं. अगधी गुडघाभर पाणी साचतं. त्यामुळं रस्ते वाहतूक विस्कळीत होते. परिणामी वाहन चालकांना साचलेल्या पाण्यातून प्रवास करावा लागतो. तसंच, चाकरमान्यांनाही आपला जीव धोक्यात घालून या गुडघाभर साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागते. त्यामुळं दरवर्षीच्या पावसाळ्यात असणारी ही समस्या कधी संपणार असा सवाल मुंबईकर विचारत आहेत.

मुंबई महापालिका क्षेत्रात पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक वेगाने व्हावा, यासाठी मुंबई महानगरपालिका विविध स्तरीय उपाययोजना सातत्यानं अंमलात आणत असते. याच अंतर्गत महापालिका क्षेत्रातील मिठी नदीसह मोठ्या नाल्यांची साफसफाई महापालिकेद्वारे नियमितपणे करण्यात येते. मोठ्या नाल्यांची साफसफाई करताना साधारणपणे पावसाळ्यापूर्वी ७५ टक्के, पावसाळ्यादरम्यान १५ टक्के आणि पावसाळ्यानंतर १० टक्के याप्रमाणे कामे केली जातात.

मुंबईची भौगोलिक परिस्थिती

७ बेटं एकमेकांना जोडून तयार केलेलं शहर, ही मुंबईची ऐतिहासिक ओळख आहे. पण या ७ बेटांवर एकूण २२ टेकड्याही होत्या. २ बाजूंना खाड्या आणि समुद्र आणि मध्ये २२ छोट्या मोठ्या टेकड्या यामुळे मुंबईची भौगोलिक परिस्थिती पूर येण्यासाठी अनुकूल आहे. घाटकोपर ते भांडूप यांदरम्यान आजही टेकड्यांची रांग दिसते. तर या टेकड्यांच्या पूर्वेकडचा प्रदेश खाडीजवळ आहे.

पूर्वी याच भागातून ठाणा नदी वाहायची, असे उल्लेख बाँबे गॅझेटिअरमध्ये आढळतात. त्यामुळे एका बाजूला टेकडी, दुसऱ्या बाजूला खाडी आणि मधला सखल प्रदेश यामुळे या भागात पाणी तुंबतं. त्याच प्रमाणे शीव (सायन) ते कुर्ला या दरम्यान खाडी आणि दलदलीचा भाग होता. रेल्वेचा पहिलावहिला मार्ग बांधताना या भागात भराव टाकण्यात आला. त्यानंतरही शहर विकसित होताना अनेक ठिकाणी दलदलीच्या प्रदेशात भराव टाकला. हा भरावाचा भाग सखल प्रदेशातच असल्यानं तिथं पाणी तुंबतं. सायन चुनाभट्टी, दादर पश्चिम आणि मुंबईतली अनेक ठिकाणं ही भराव टाकून अस्तित्वात आली आहेत. यातले काही भाग भरावानंतरही सखल आहेत; तिथं दरवर्षी पाणी तुंबतं.

मुंबईला तीन बाजूंनी समुद्रानं वेढलेले आहे. समुद्र आणि खाडी ते जमीन यांच्यामध्ये दलदलीच्या प्रदेशात असलेल्या खारफुटी जंगलांमुळे मुंबईचा किनारा सुरक्षित राहतो. खारफुटीचं जंगल समुद्राच्या पाण्याचा वेग कमी करतं आणि जमिनीवर पाणी पसरू देत नाही. पण गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईला पडलेल्या बेकायदेशीर झोपड्यांच्या आणि काही इमारतींच्याही विळख्यामुळे ही खारफुटीची जंगलं आणि मिठागरे नष्ट होत चालल्याचं दिसतं.

काही वर्षांपूर्वीपर्यंत मुंबईचं क्षेत्रफळ साडेचारशे चौरस किमीच्या आसपास होतं. आता हेच क्षेत्रफळ ६०३ चौरस किलोमीटर एवढं पसरलं आहे. ही वाढ भराव टाकून झाली आहे. ही वाढ करताना रस्ते, मलनि:सारण, पाण्याचा निचरा या गोष्टींचा काहीच नियोजनबद्ध विचार झाला नाही. त्यामुळं त्याचा फटका आता मुंबईकरांना बसत आहे.

गतवर्षीची नाले सफाई

गतवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेनं नाले सफाईला सुरूवात केली. लहान नाले, पर्जन्यपेटिक, बॉक्स ड्रेन यासाठी १५१ कोटी रुपयांचा खर्च, तसंच मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी ८३ कोटी रुपये खर्च करणार असल्याचं बातमीपत्र सांगतात.

मुंबईत २१५ किलोमीटरचे मुख्य नाले आहेत; तर १५६ किलोमीटर लांबीचे लहान नाले आहेत. तसेच १ हजार ९८६ किलोमीटर लांबीच्या पर्जन्यपेटिका आहेत. २०२१ साली कोरोनामुळं लागू झालेल्या लॉकडाऊनमध्येही मुंबईतील १०४ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा प्रशासनानं केला होता. त्यावेळी तब्बल ३ लाख २४ हजार २८२ मेट्रिक टन गाळ काढण्यात आला. मात्र, त्यानंतरही मुंबईतील अनेक भागांत दरवर्षीप्रमाणे पाणी साचले होते.

काही वर्षांपूर्वी मुंबईत नालेसफाईचा घोटाळा उघड झाला होता. त्यामुळं दरवर्षीच नालेसफाईच्या कामावर प्रश्‍न निर्माण केले जातात. आता मार्चआधीपासूनच नालेसफाई सुरू होणार असल्यानं पावसाळ्यातील परिस्थितीवर सर्वांचे लक्ष असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करता वापरण्यात येणार निधीचा वापर खालील प्रकारे केला जाणार आहे.

असा होणार खर्च

शहर

  • मोठे नाले - ११ कोटी ७६ लाख 
  • लहान नाले - ८ कोटी ३४ लाख 

पूर्व उपनगर 

  • मोठे नाले - २६ कोटी ७५ लाख 
  • लहान नाले - ३२ कोटी ४८ लाख

पश्‍चिम उपनगर 

  • मोठे नाले - ४५ कोटी ३१ लाख 
  • लहान नाले - ६१ कोटी ४४ लाख

भूमीगत टाक्या

पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी गतवर्षी महापालिकेनं भूमिगत टाक्यांचा प्रकल्प हाती घेतला. त्यानुसार, प्रमोद महाजन उद्यान, हिंदमाता फ्लायओव्हर, सेंट झेव्हियर्स ग्राउंड इथं भूमिगत टाक्या तयार केल्या जात आहेत.

हिंदमाता परिसर खोल असल्यामुळे पावसाळ्यात त्याठिकाणी पाणी साचते. मुसळधार पाऊस झाल्यास या परिसरात मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्याचा लवकर निचरा होत नाही. या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेमार्फत भूमिगत टाक्या बांधण्यात येत आहेत.  या मोठ्या भूमिगत टाक्या कमीतकमी तीन तास पावसाचे अतिरिक्त पाणी साठवून ठेवू शकतील. मुसळधार पाऊस आणि समुद्रात मोठी भरती असल्यास याचा विशेष उपयोग होऊन या ठिकाणी साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा महापालिकेला विश्वास वाटत आहे.

४५ हजार ९४९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प

मुंबई महापालिका दरवर्षी अर्थसंकल्प सादर करते आणि या अर्थसंकल्पात रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी भरघोस तरतुद करते. यंदाही मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी ४५ हजार ९४९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी निधीची तरतुद केली आहे. मात्र या निधीचा योग्य वापर करत पालिका मुंबईकरांना पक्के रस्ते देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, निवडणुका होणार असल्यानं मागील ५ वर्षात जितकी कामं केली नसतील, तितक्या कामांचा श्रीगणेशा, उद्घाटन, नारळ फोडणे वगैरे काम सुरू आहे. यात प्रामुख्याने रस्ते दुरूस्ती, नालेदुरूस्ती वगैरे वगैरेचा सपाटा सुरू आहे.

मूलभूत नागरी सेवासुविधांसाठी भरीव निधीची तरतूद

मुंबईकरांना दर्जेदार रस्ते, पदपथ, पूल, आरोग्य सुविधा, उद्याने, इलेक्ट्रिक बस सेवा, दर्जेदार शिक्षण, कोस्टल रोड, पूरस्थिती नियंत्रण, नद्यांचे पुनरुज्जीवन, रुग्णालये, दवाखाने यांची दरजोन्नती, विशेष मुलांसाठी सुविधा, कचरा व्यवस्थापन, कचरा व पाण्यापासून वीज निर्मिती, मंडई विकास, ऑक्सिजन प्लांट, शाळांची दुरुस्ती आदी मूलभूत नागरी सेवासुविधांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा