Advertisement

IPL मध्ये होऊ घातलेत पाॅवरफूल बदल

इंडियन प्रीमियर लिग(IPL) च्या आगामी २०२० सीझनमध्ये दोन नवे प्रयोग करण्याचं बीसीसीआय (BCCI)ने ठरवलं होतं. सद्यस्थितीत तरी या प्रयोगांना पोतडीतून बाहेर काढण्यास थोडा अवकाश असला, तरी त्यामुळे भविष्यात क्रिकेटच्या खेळातील रंजकता वाढण्यास मोठी मदतच होणार आहे.

IPL मध्ये होऊ घातलेत पाॅवरफूल बदल
SHARES

सध्या भारतीय क्रिकेटमध्ये बदलाचे वारे वाहताहेत. काळाच्या ओघात क्रिकेट खेळण्याच्या शैलीत, तंत्रात जसे बदल झाले, तसेच बदल क्रिकेटला मदतगार ठरणाऱ्या तंत्रज्ञानातही झाले. त्याचा या खेळाचा दर्जा सुधारण्याला खूपच मोठा हातभार लागला आहे. हे सांगण्याचा मुद्दा अशासाठी की काही दिवसांपूर्वीच इंडियन प्रीमियर लिग(IPL) च्या आगामी २०२० सीझनमध्ये दोन नवे प्रयोग करण्याचं बीसीसीआय (BCCI)ने ठरवलं होतं. सद्यस्थितीत तरी या प्रयोगांना पोतडीतून बाहेर काढण्यास थोडा अवकाश असला, तरी त्यामुळे भविष्यात क्रिकेटच्या खेळातील रंजकता वाढण्यास मोठी मदतच होणार आहे. 

एकेकाळी पांढऱ्या पेहरावात ५ दिवस चालणाऱ्या क्रिकेटच्या रटाळ फाॅरमॅटला कॅरी पॅकर नावाच्या जादूगाराने झणझणीत तडका दिला. पांढरा बाॅल, रंगीबेरंगी कपडे आणि केवळ ५० ओव्हरचे एकदिवसीय (one day) सामने आयोजित करून त्याने क्रिकेटचा अक्षरश: कायापालट करून टाकला. जोडीला अॅक्शन रिप्ले, थर्ड अंपायर, डिजिटल स्कोअरकार्ड डिस्प्ले अशा तंत्रज्ञानानेही या खेळातली रंजकता वाढवली. क्रिकेटप्रेमीही या नव्या बदलाने हरखून गेले. त्यानंतर आला २०-२० चा जमाना. अवघ्या काही तासांत संपणारे सामने, बॅट्समन, बाॅलर्सचं रंगणारं तुंबळ युद्ध पाहून क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. कधी एलइडी लाइट असलेले स्टम्प्स तर कधी गुलाबी बाॅल क्रिकेटमध्ये करण्यात येणारे हे नवनवे प्रयोग या खेळाला अधिकच मनोरंजक, आकर्षक करत आहेत. 

कुठले प्रयोग?

त्याच अनुषंगाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळा(BCCI) ने येऊ घातलेल्या आयपीएलच्या २०२० सीझनमध्ये ‘पाॅवर प्लेयर’ आणि ‘नो बाॅल'साठी विशेष अंपायर नेमण्याची योजना आखली होती. या योजनेचा प्रस्ताव आयपीएल (IPL)च्या गव्हर्निंग काऊंन्सिलच्या बैठकीत मांडण्यात आला. आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत झालेल्या या बैठकीत दोन्ही प्रस्तावांवर चर्चा झाली. त्यापैकी ‘पाॅवर प्लेयर’ (Power Player)चा प्रयोग सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत राबवण्यात येणार होता. मात्र वेळेच्या अभावामुळे हा निर्णय तूर्तास रद्द करण्यात आला. तर आयपीएलच्या या सीझनमध्ये ‘नो बाॅल' (No ball) साठी वेगळा अंपायर ठेवण्यावर बहुतांश सदस्यांचं एकमत झालं. 


काय आहे ‘पाॅवर प्लेयर’?

  • फुटबाॅलमध्ये ज्या प्रकारे मैदानात उपस्थित असलेल्या ११ प्लेअर व्यतीरिक्त कुठल्याही दोन बदली खेळाडूंना पंचांच्या परवानगी मैदानात उतरता येतं. त्याच पद्धतीने अंतिम १५ प्लेअरमधील कुठल्याही एका खेळाडूला या निमांतर्गत ‘पाॅवर प्लेयर’ म्हणून मैदानात उतरवता येईल. ११ खेळाडू मैदानावर असतील आणि ४ खेळाडू प्लेयिंग इलेव्हनमध्येच असतील. पण संघात त्यांना गरज पडेल तसं त्यांना घेण्यात येईल. याआधी फक्त क्षेत्ररक्षण करण्यासाठी फक्त इतर खेळाडू उतरत होते, आता हे ४ खेळाडू बदली खेळाडू म्हणून फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी उतरतील.  
  • फुटबॉलमध्ये ९० मिनिटांच्या सामन्यात अनेकदा शेवटची १० मिनिटे मैदानावर येऊन हा बदली खेळाडू सुपर कामगिरी करत आपल्या टीमला जिंकवूनही देतो. त्याच्या या कामगिरीवर नंतर त्याला अंतिम ११ मध्ये खेळण्याची संधीही मिळते. तशीच संधी बदली खेळाडू म्हणून नवख्या तरूणांना मिळू शकेल.   
  • टी २० क्रिकेट जेव्हा सुरू झालं, खासकरून भारतीय उपखंडात तेव्हा बाॅलर्सला बदडून काढणारा फाॅरमॅट म्हणून त्याची चेष्टा होऊ लागली होती. परंतु फास्ट किंवा स्पीनर्स अशा दोन्ही प्रकारच्या बाॅलर्सनी जबरदस्त कामगिरीच्या जोरावर ही टीका खोडून काढली आणि टी २० फाॅरमॅटमध्ये आपला दबदबा कायम राखला भारतातील पाटा पीचवर खेळण्यात येणाऱ्या मॅचमध्येही बाॅलर्सनी अफलातून कामगिरी करत एकहाती मॅच जिंकवून दिल्याची अनेक उदाहरणं आहेत.  
  • ‘पॉवर प्लेयर’ मैदानातील अंतिम ११ प्लेअर्सव्यतीरिक्त उरलेल्या ४ प्लेअर्समधून निवडता येईल. त्यामुळे अंतिम १५ खासकरून ४ बदली खेळाडू निवडण्याचं मोठं आव्हान टीम मॅनेजमेंटपुढं असेल. आपल्या प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू, सामन्याचं ठिकाण, तिथलं हवामान, निकालांची आकडेवारी, असे अनेक मुद्दे त्यांना विचारात घ्यावे लागतील.
  • उरलेले ४ जण निवडताना एक स्पीनर, एक फास्टर, एक पिंच हिटर असे वैविध्यपूर्ण पर्याय मॅनेजमेंटला ठेवता येतील. पण त्यातही जो प्लेअर्स बॅटींग, बाॅलिंग आणि फिल्डींग अशी तिहेरी जबाबदारी अष्टपैलू म्हणून यशस्वीपणे हाताळू शकेल. तेही दडपणाच्या वेळी त्याच प्लेअरला ऐनवेळी बोलावणं येऊ शकेल. कारण ‘पॉवर प्लेयर’ या संकल्पनेनुसार मोक्याच्या क्षणी आपली कामगिरी उंचावत या खेळाडूला पाॅवरपॅक परफाॅर्मंन्स द्यावा लागेला.  


सदोष पंचगिरीसाठी

आयपीएलच्या गेल्या सीझनमध्ये अंपायरची खराब कामगिरी चर्चेचा विषय ठरला होता. त्यामुळे या हंगामात असे प्रकार टाळण्यासाठी No-Ball करता स्वतंत्र पंचांची नेमणूक करण्याचा गव्हर्निंग काऊन्सिलचा विचार आहे.

सर्व गोष्टी सुरळीत पार पडल्या तर आगामी हंगामात No-Ball साठी स्वतंत्र पंच पहायला मिळेल. ही संकल्पना थोडीशी विचीत्र आहे, पण गेल्या हंगामातील चुका पाहता यावर चर्चा होणं गरजेचं होतं. यासाठी तंत्रज्ञानाचाही वापर केला जाईल. या पंचाला दुसरं कोणतंही काम देण्यात येणार नाही, तो फक्त No-Ball आहे की नाही एवढच काम करेल, असं गव्हर्निंग काऊन्सिलच्या सदस्याने पत्रकारांना सांगितलं.

आयपीएलच्या गेल्या सीझनमध्ये अंपायर एस. रवी यांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीचा संताप सर्वांनी अनुभवला आहे. इतकंच नाही, तर ‘कॅप्टन कूल’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या धोनीनेही अंपायरने दिलेल्या चुकीच्या निर्णयामुळे मैदानात येऊन वाद घातला होता. येत्या सीझनमध्ये हा बदल झाल्यास अशा चुका पहायला मिळणार नाही अशी आशा क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत. एकूणच काय तर हे नवीन बदल क्रिकेटचा दर्जा वाढवणारे ठरणार आहेत.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा