Advertisement

१०.६० कोटींमध्ये तीन नवे गोलंदाज मुंबईच्या ताफ्यात


१०.६० कोटींमध्ये तीन नवे गोलंदाज मुंबईच्या ताफ्यात
SHARES

इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. आयपीएलमधील ८ संघांकडून त्यांच्याकडील खेळाडू आणि संघातून मुक्त करणाऱ्या खेळाडूंची यादी गेल्या महिन्यात जाहीर करण्यात आली होती. तसेच काही संघांनी लिलावापूर्वीच खेळाडूंची अदलाबदली केली होती. दरम्यान आयपीएलच्या १४ व्या  हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव सुरु आहे. या लिलाव प्रक्रियेत एकूण २९२ खेळाडू उतरले असून ही प्रक्रिया चेन्नईमध्ये सुरु आहे. दरम्यान, गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाने तब्बल १०.६० कोटी रुपये खर्च करुन तीन नवे गोलंदाज ताफ्यात सामावून घेतले आहेत. त्यामुळे मुंबईची गोलंदाजी अजून मजबूत झाली आहे. ३ नव्या गोलंदाजांसह मुंबईचा संघ सहाव्यांदा विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे.

लिलावापूर्वी मुंबईकडे १५ कोटी ३५ लाख रुपयांची राशी उपलब्ध होती. मुंबईचा संघ त्यांच्या ताफ्यात ७  नवे खेळाडू समावून घेऊ शकतो. त्यापैकी १०.६० कोटी रुपये मुंबईने खर्च केले आहेत आणि यात मुंबईने तीन नवे गोलंदाज संघात घेतले आहेत. सर्वात आधी मुंबई इंडियन्सने न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज अॅडम मिल्ने याला संघात सामावून घेतलं आहे. मिल्नेसाठी मुंबईने तब्बल ३.२० कोटी रुपये मोजले आहेत. अॅडमसाठी सुरुवातीला राजस्थान रॉयल्स आणि मुंबईमध्ये चुरस सुरु होती. त्यानंतर यामध्ये सनरायझर्स हैदराबादने उडी घेतली. अखेर ही स्पर्धा मुंबईने जिंकली. मुंबईने ३.२० कोटी रुपयांच्या बोलीवर अॅडम मिल्ने याला ताफ्यात सामावून घेतले.

अॅडमनंतर मुंबईने गेल्या महिन्यात संघमुक्त केलेल्या (रिलीज केलेल्या) नॅथन कुल्टर नाईल याला पुन्हा एकदा खरेदी केलं आहे. मुंबईच्या संघाने कुल्टर नाईलला ५ कोटी रुपयांच्या बोलीवर संघात पुन्हा सामावून घेतलं आहे. कुल्टर नाईलनंतर मुंबईने भारतीय फिरकीपटू पियुष चावला यालादेखील संघात सामावून घेतलं आहे. पियुषसाठी मुंबई इंडियन्सने तब्बल २.४० कोटी रुपये मोजले आहेत. मुंबईची फलंदाजी मजबूत आहेच. त्यामुळे मुंबईचे संघमालक आज गोलंदाजांची खरेदी करण्यासाठीच लिलावाला उपस्थित होते. मुंबईने आज केवळ आतापर्यंत गोलंदाजांवरच बोली लावली आहे.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कॅप्टन), आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकूल रॉय, धवल कुलकर्णी, हार्दिक पांड्या, इशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, क्वींटन डी कॉक, राहुल चाहर, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, ख्रिस लिन, सौरभ तिवारी, मोहसिन खान, नॅथन कुल्टर नाईल, पियुष चावला, अॅडम मिल्ने.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा