Advertisement

मुंबईचीच पोरं हुश्शार! आयपीएलचं तिसरं विजेतेपद पटकावलं


मुंबईचीच पोरं हुश्शार! आयपीएलचं तिसरं विजेतेपद पटकावलं
SHARES

सामन्यातला शेवटचा बॉल आणि पुण्याला जिंकण्यासाठी हव्यात 4 रन्स... कोण जिंकणार..? मुंबई की पुणे? दोन्ही बाजूंकडील चाहत्यांची धडधड वाढलेली... मुंबईचा बॉलर मिचेल जॉन्सनने बॉल टाकताच... तो डी. ख्रिश्चियनने लेग साईडला टोलावला… बाऊंड्रीवर अत्यंत चपळाई बॉल अडवून सुचिथने तितक्याच जलदगतीने विकेट किपर पार्थिव पटेलकडे थ्रो फेकला अन् तिसरा रन घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या वॉशिंग्टन सुंदरला रन आऊट करून मुंबई इंडियन्सने पुण्याचे विजयाचे स्वप्न उद्ध्वस्त करून टाकले. त्यानंतर मैदानावर अन्  घराघरांत एकच जल्लोष होऊ लागला तो मुंबईचीच पोरं हुश्शार असा..!  

मागच्या दोन विजेतेपदांचा सारा अनुभव पणाला लावत मुंबई इंडियन्सने अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात रायझिंग पुणे सुपरजायन्ट्सवर अवघ्या एका रन ने विजय मिळवून आयपीएलचं तिसरं विजेतेपद पटकावलं. मुंबई इंडियन्सने अवघ्या 130 रन्सचं माफक आव्हान रायझिंग पुणेसमोर ठेवलं होतं. त्यातही पुण्यानं 71/1 अशी दमदार सुरुवात करुनदेखील कॅप्टन रोहित शर्माच्या टीमने अत्यंत चिकाटी आणि संयमी खेळाचे प्रदर्शन घडवत अशक्यप्राय विजय खेचून आणला.  

टॉस जिंकून कॅप्टन रोहित शर्माने बॅटींगचा निर्णय घेतला. पंरतु पुणे सुपरजायन्ट्सच्या बॉलर्सनी अगदी सुरूवातीपासूनच अचूक टप्प्यावर बॉलिंग करून मुंबईच्या बॅट्समनची कोंडी करून टाकली. रन्सच्या शोधात असलेला पार्थिव पटेल आणि लिंडन सिमन्सला सामन्याच्या तिसऱ्याच ओव्हरमध्ये जयदेव उनाडकटने ड्रेसिंग रुममध्ये पाठवले. अवघ्या 7 रन्सवर 2 विकेट्स लागोपाठ पडल्यानंतर मुंबई दबावात आली. त्यानंतर ग्राऊंडमध्ये उतरलेल्या अंबाटी रायडू आणि रोहित शर्माची जोडी जमेल असे वाटत असतानाच पुण्याचा कॅप्टन स्टिव्ह स्मिथने अप्रतिम थ्रो करत रायडूला रन आऊट केले. त्यानंतर मोठा शॉट खेळण्याच्या नादात रोहितदेखील आपली विकेट गमावून बसला. रोहितने 22 बॉल्समध्ये 24 रन्स केल्या.

रोहितनंतर बॅटींगसाठी उतरलेल्या पोलार्डने येताचक्षणी सिक्सर ठोकला खरा, पण पुण्यानं लावलेल्या अचूक फिल्डींगच्या जाळ्यात पोलार्ड अलगत अडकला. त्याने 3  बॉल्समध्ये अवघे 7 रन्स केले. त्यानंतर कृणाल आणि हार्दिक पंड्या या दोघांवरच सारी भिस्त होती. परंतु हार्दिकदेखील 10 रन्स करून आऊट झाल्याने मुंबईची अवस्था 7/ 79 अशी झाली आणि मुंबईच्या मोठ्या स्कोअरच्या साऱ्या आशा मावळल्या. कृणालच्या 38 बॉल्समध्ये केलेल्या 47 रन्सच्या जोरावर मुंबईने सर्वबाद 129 रन्स केल्या.

त्यानंर अवघ्या 130 रन्सने माफक आव्हान घेऊन ग्राऊंडमध्ये उतरलेली पुणे सुपरजायन्ट अत्यंत आरामात फायनल जिंकेल असे वाटत होते. त्रिपाठी 3 रन्समध्ये आऊट होऊनही कॅप्टन स्टिव्ह स्थिथ आणि अजिंक्य राहाणे यांच्या जोडीने टीमची धुरा सांभाळत 71/1 अशी दमदार सुरूवात करून दिली. रहाणे 44 रन्सवर आऊट झाल्यानंतरही स्मिथ आणि धोणीने पुण्याच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. पण धोणी 17 व्या ओव्हरमध्ये ऐन मोक्याच्या क्षणी आऊट झाल्याने ही लढत कमालीची रंजक बनली. मुंबईच्या बॉलर्सनी अत्यंत टिच्चून मारा करत विजयाचे पारडे आपल्या बाजूने झुकवण्यास सुरूवात केली. तरी स्थिम ग्राऊंडमध्ये असेपर्यंत मुंबईची धाकधुक कायम होती.  

शेवटच्या ओव्हरमध्ये पुण्याला जिंकण्यासाठी 11 रन्स हवे होते. रोहितने बॉल अनुभवी बॉलर मिचेल जॉन्सनच्या हाती सोपवला. पहिल्या बॉलवर मनोज तिवारीने स्वेअर लेगला फोर मारून विजयरथ समीप आणला. आता पुण्याला जिंकण्यासाठी 5 बॉल्समध्ये फक्त 7 रन्सच करायचे होते. पण पुढच्याच बॉलवर तिवारी पोर्डकडे कॅच देत आऊट झाला आणि त्याच्याच पुढच्या बॉलवर स्मिथही (50) आऊट झाल्याने पुण्याला मोठा दणका बसला. जॉन्सनने एकापाठोपाठ दोन विकेट घेऊन पुण्याची अवस्था 'करो या मरो' अशी करुन टाकली. शेवटच्या 3 बॉल्समध्ये 7 रन्स काढणं पुण्याला जड झालं. 2 बॉल्समध्ये 2 रन्स निघाल्यानंतर शेवटच्या 1 बॉलवर पुण्याला जिंकण्यासाठी बाऊंड्रीची आवश्यकता होती. पण शेवटच्या बॉलवर पुण्याची धाव 2 रन्सनी तोकडीच पडली.    

आयपीलमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू –

मॅन ऑफ द मॅच – कृणाल पंड्या

मोस्ट व्हॅल्युबल प्लेअर – बेन स्टोक्स

ऑरेंज कॅप – डेव्हीड वॉर्नर

पर्पल कॅप – भुवनेश्वर कुमार

इमर्जिंग प्लेअर – बासील थम्पी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा