Advertisement

पोलार्डची तुफानी फलंदाजी; मुंबईचा दमदार विजय

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईनं विजय मिळवला आहे. कायरन पोलार्डच्या तुफानी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सन विजय मिळवला आहे.

पोलार्डची तुफानी फलंदाजी; मुंबईचा दमदार विजय
SHARES

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईनं विजय मिळवला आहे. कायरन पोलार्डच्या तुफानी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सन विजय मिळवला आहे. मुंबईच्या सलामीवीर फलंदाजांनी देखील अर्धशतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. पोलार्डनं नाबाद ३४ चेंडूत ८७ धावांची विजयी खेळी साकारली. तसेच क्विंटन डी कॉकने ३७, रोहित शर्मानं ३५ आणि कृणाल पंड्याने ३२ धावा केल्या. तसंच, हार्दिक पंड्यानं ७ चेंडूत २ षटकार मारत १६ धावांची निर्णायक खेळी केली.

दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर चेन्नई सुपर किंग्जनं धावांचा पाऊस पाडत मुंबईच्या गोलंदाजांना नामोहरम केले. रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स आणि महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये आज आयपीएलच्या १४व्या हंगामाचा २७वा सामना रंगत  आहे. नाणेफेक जिंकलेल्या मुंबईने प्रथम चेन्नईला फलंदाजीचे आमंत्रण दिले. फाफ डु प्लेसिस, मोईन अली आणि अंबाती रायुडू यांनी केलेल्या अर्धशतकी खेळींमुळे चेन्नईने २० षटकात ४ बाद २१८ धावा फलकावर लावल्या.

फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी चेन्नईच्या डावाची सुरुवात केली. मात्र, ट्रेंट बोल्टने टाकलेल्या पहिल्याच षटकात ऋतुराज माघारी परतला. मागील काही सामन्यात ऋतुराजने जबरदस्त कामगिरीचे प्रदर्शन केले होते. मात्र यावेळी त्याला फक्त ४ धावांचे योगदान देता आले. ऋतुराज स्वस्तात बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या मोईन अलीने मोर्चा संभाळला. त्याने सलावीर फाफ डु प्लेसिससोबत भागीदारी रचली. पहिल्या पॉवरप्लेमध्ये चेन्नईने १ बाद ४९ धावा फलकावर लावल्या. यंदाच्या हंगामात चांगल्या फॉर्मात असलेल्या मोईन अलीने १०व्या षटकात अर्धशतक पूर्ण केले. ३३ चेंडूत मोईनने अर्धशतक साकारले.

जसप्रीत बुमराहने टाकलेल्या ११व्या षटकात डु प्लेसिसने षटकार खेचत चेन्नईचे शतक फलकावर लावले. याच षटकात डु प्लेसिस आणि अलीने आपली शतकी भागीदारी पूर्ण केली. षटकाच्या पाचव्या चेंडूवर बुमराहने मोईन अलीला माघारी धाडले. अलीने ५ चौकार आणि ५ षटकारांसह ५८ धावा केल्या. अली बाद झाल्यानंतर डु प्लेसिसने २७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकानंतर तो पोलार्डच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने ४ चौकार आणि २ षटकारांसह ५० धावांची खेळी केली. डु प्लेसिसनंतर सुरेश रैनाही माघारी परतला. त्याला केवळ २ धावा करता आल्या. पोलार्डने मुंबईसाठी टाकलेल्या १२व्या षटकात दोन बळी घेत चेन्नईला संकटात टाकले.

अंबाती रायुडू आणि रवींद्र जडेजा यांनी भागीदारी रचली. जडेजाने संयमी तर, रायुडूने आक्रमक पवित्रा धारण करत मुंबईच्या वेगवान गोलंदाजांवर हल्ला चढवला. डावाच्या १७व्या षटकात रायुडू-जडेजा यांनी ३० चेंडूत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. १७ षटकात चेन्नईने ४ बाद १७४ धावा केल्या. बुमराहने टाकलेल्या या षटकात रायुडू-जडेजा यांनी २१ धावा वसूल केल्या. आक्रमक खेळणाऱ्या रायुडूने १८व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले.

अवघ्या २० चेंडूत रायुडूने अर्धशतक साकारले. यंदाच्या हंगामातील हे दुसरे वेगवान अर्धशतक ठरले. धवल कुलकर्णीने टाकलेल्या शेवटच्या षटकात चेन्नईला १४ धावा घेता आल्या. २० षटकात चेन्नईने ४ बाद २१८ धावा केल्या. रायुडूने २७ चेंडूत ७ षटकार आणि ४ चौकारांसह नाबाद ७२ धावांची खेळी केली. तर, जडेजा २२ धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी ४९ चेंडूत १०२ धावांची भागीदारी रचली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा