Advertisement

मुंबईच्या सूर्यकुमार यादवची तुफान फलंदाजी; झालेल्या पराभवाची केली परतफेड


मुंबईच्या सूर्यकुमार यादवची तुफान फलंदाजी; झालेल्या पराभवाची केली परतफेड
SHARES

मुंबई इंडियन्स (mumbai indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (royal challengers bangalore) यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईनं सूर्यकुमार यादवनं केलेल्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर विजय मिळवला आहे. आयपीएलच्या (IPL 2020) प्रथम सत्रातील सामन्यात झालेल्या पराभवाची भरपाई मुंबईनं या सामन्यात ५ गडी राखून केली. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूच्या संघाने १६४ धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादवने तुफान फटकेबाजी करत नाबाद ७९ धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.

मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर देवदत्त पडीकलनं दमदार अर्धशतक ठोकत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली होती. देवदत्त पडीकल आणि जोशुआ फिलीप यांनी दमदार सुरूवात केली. जोशुआ फिलिप २४ चेंडूत ३३ धावा काढून माघारी परतला. कर्णधार विराट कोहलीही ९ धावांवर बाद झाला. त्यानंतर शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्याच्या नादात डीव्हिलियर्स १५ धावा करत झेलबाद झाला. पाठोपाठ शिवम दुबेही तंबूत परतला.

मात्र, खेळपट्टीवर स्थिरावलेल्या देवदत्त पडीकलने दमदार ७४ धावा केल्या. त्याने ४५ चेंडूत १२ चौकार आणि १ षटकार खेचत ७४ धावा केल्या. त्याच्या खेळीच्या जोरावर संघाने १६४पर्यंत मजल मारली. या सामन्यात जसप्रीत बुमराहनं ३ तर बोल्ट, राहुल चहर आणि पोलार्डनं या १-१ बळी टिपला.

१६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉक १८ धावांवर झेलबाद झाला. इशान किशनला चांगली सुरूवात मिळाली पण मोठा फटका खेळताना तो २५ धावांवर बाद झाला. धावगतीचा विचार करत सौरभ तिवारीही मोठा फटका खेळताना ५ धावा काढून माघारी परतला. पाठोपाठ कृणाल पांड्याही १० धावांवर बाद झाला. हार्दिक पांड्याने १७ धावा केल्या. पण सूर्यकुमार यादवने एक बाजू लावून धरत धडाकेबाज अर्धशतक ठोकलं. त्याने ४३ चेंडूत नाबाद १० चौकार आणि ३ षटकार खेचत ७९ धावा केल्या. बंगळुरूकडून युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराजने २-२ तर ख्रिस मॉरिसने १ बळी टिपला.

संबंधित विषय
Advertisement