रुद्र धांडेने तडकावले 67 चेंडूत विक्रमी द्विशतक

  Dadar
  रुद्र धांडेने तडकावले 67 चेंडूत विक्रमी द्विशतक
  मुंबई  -  

  शेवटच्या टप्प्यात अालेल्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये क्रिकेटप्रेमींना अत्यंत अभावानेच शतकी खेळीचा नजराणा अनुभवण्यास मिळत असताना स्थानिक क्रिकेटमध्ये रिझवी महाविद्यालयाच्या फलंदाजाने चक्क 67 चेंडूंमध्येच नाबाद द्विशतक ठोकून नव्या विक्रमाची नोंद केली आहे. रुद्र धांडे असे या 19 वर्षीय धडाकेबाज फलंदाजाचे नाव असून त्याने ही जबरदस्त कामगिरी 'अबीस रिझवी चॅम्पियन्स ट्रॉफी सुपर-8 कॉलेज क्रिकेट टुर्नामेंट' स्पर्धेत पी. दालमिया संघाविरुद्ध केली आहे. रुद्रच्या खेळीचे सर्वच स्तरावरुन कौतुक होत आहे.

  मुंबई विद्यापीठ आयोजित आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने माटुंगा जिमखाना मैदानावर 'अबीस रिझवी चॅम्पियन्स ट्रॉफी सुपर-8 कॉलेज क्रिकेट टुर्नामेंट' स्पर्धा भरविण्यात आली आहे. या स्पर्धेत रिझवी महाविद्यालय विरुद्ध पी. दालमिया महाविद्यालय या सामन्यात नाणेफेक जिंकून रिझवीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

  संघाला दमदार धावसंख्या उभारुन देण्याच्या इराद्याने सलामीला उतरलेल्या रुद्र धांडेने खेळपट्टीचा सुरूवातीपासूनच ताबा घेतला. जोडीदार लवकर बाद होऊनही रुद्रने आपली धावगती कमी केली नाही. 39 चेंडूंत शतक झळकावल्यानंतर त्याने 67 चेंडूंत आपले द्विशतक पूर्ण केले. या खेळीदरम्यान रुद्रने 21 चौकार आणि 15 षटकारांची आतिषबाजी केली. रिझवी महाविद्यालयाने अवघ्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 20 षटकांत 322 धावांचा डोंगर उभारला.

  या धावसंख्येचा सामना करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दालमिया महाविद्यालय संघाला 10.2 षटकांत केवळ 75 धावांपर्यंत मजल मारता आली. रिझवी महाविद्यालयाने हा सामना 247 धावांच्या मोठ्या फरकाने आरामात खिशात घातला.

  मी माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवले. तेच माझे प्रशिक्षक आहेत. या विक्रमाची जेव्हा मी त्यांना माहिती दिली, तेव्हा ते खूप खूश झाले. त्यांनी हीच कामगिरी पुढे कायम ठेवून मुंबई निवड चाचणीमध्ये छाप पाडण्याबाबत सांगितले आहे. माझ्या आई - वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी ही खेळी केल्याचा मला जास्त आनंद आहे. ही खेळी त्यांच्यासाठी परफेक्ट गिफ्ट आहे. या खेळीनंतर मी नि:शब्द झालो असून माझ्याकडून असा पराक्रम झाल्याचा विश्वासच बसत नाही.
  - रुद्र धांडे, क्रिकेटपटू

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.