पैशांसाठी चिमुकल्या मित्राची हत्या, मृतदेह सापडला भाईंदरच्या खाडीत


पैशांसाठी चिमुकल्या मित्राची हत्या, मृतदेह सापडला भाईंदरच्या खाडीत
SHARES

पवई परिसरात एका १० वर्षाच्या मुलाची त्याच्याच मित्रांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी दोघांना अटक केली असून मुलाच्या वडिलांकडून पैसे उकळण्यासाठी ही हत्या झाल्याचे समजते.

पवईच्या तुंगा परिसरात राहाणारा रितेश सिंग नावाचा १० वर्षांचा मुलगा रविवारी त्याच्या गावच्या अमर सिंग (२०) नावाच्या मित्रासोबत खेळायला गेला होता. दुपारी दोन वाजता गेलेला रितेश संध्याकाळ झाली तरी परतला नाही म्हणून मुलाच्या वडिलांनी अमर सिंगकडे विचारणा केली असता त्याने मुलाला तिथेच सोडलं असून तो पुढे भाईंदरला आला असल्याचे अमरने सांगितले. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी मुलाची शोधाशोध केली. पण मुलगा काही सापडला नाही. शेवटी त्यांनी पवई पोलीस ठाण्यात जाऊन अपहरणाचा गुन्हा नोंदवला.


पोलीस तपासानंतर सर्व गूढ उकलले

या प्रकरणी आम्ही रविवारी रात्रीच अपहरणाचा गुन्हा नोंद करून तपासाला सुरुवात केली होती. आम्ही पवईतील बरीच ठिकाणे शोधली मात्र मुलगा काही भेटला नसल्याची माहिती पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी दिली.

सोमवारी ज्या अमर सिंग नावाच्या मित्रासोबत रितेश गेला होता, तो देखील रितेशला शोधण्यात मदत करू लागला. मात्र काही केल्या रितेश सापडत नसल्याने पोलिसांचा संशय बळावला. रितेशच्या वडिलांनी देखील त्यांना अमरसिंगवर संशय असल्याचं सांगताच अमर सिंगला पोलिसांनी ताब्यात घेतले.


अमरसिंगने हत्येची दिली कबुली

चौकशीत अमरसिंगने आपल्या लल्लू सिंग (२०) नावाच्या मित्रासोबत मिळून रितेशची हत्या करून त्याचा मृतदेह खाडीत फेकल्याचे कबुल केले. त्यानंतर मंगळवारी सकाळी भाईंदरच्या खाडीतून रितेशचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. मंगळवारी दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केले असून त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती अनिल पोफळे यांनी दिली आहे.


मुलाच्या वडिलांना बघितलं होतो पैसे मोजताना

रितेश सिंगचे वडील हे एक मजूर होते. मात्र एकदा कधी मुख्य आरोपी असलेल्या अमर सिंगने त्यांना पैसे मोजताना बघितले होते. रितेशचे अपहरण केले तर त्यांच्याकडून ४ ते ५ लाख रुपये उकळता येतील, असा त्याचा प्लॅन होता. मात्र रितेश बेपत्ता होताच वडिलांनी जेव्हा अमरसिंगला फोन केला आणि सांगितले कोणत्याही परिस्थिती मला माझा मुलगा हवाच आहे. तेव्हा हे दोघे घाबरले आणि रितेशची हत्या करण्यात आल्याचे समजते.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा