मुंबईत ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांची संख्या शंभरावर


मुंबईत ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांची संख्या शंभरावर
SHARES

मुंबईत रात्री दहानंतर फटाके वाजवून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या १०० हून अधिक जणांवर मुंबई पोलिसांनी चार दिवसात कारवाई केली आहे. या कारवाईत फटाक्यांची बेकायदा विक्री करणाऱ्या ५३ जणांवर कारवाई केल्याची महिती पोलिस उपायुक्त मंजूनाथ सिंगे यांनी दिली.


आदेशाचं उल्लंघन

मुंबईत दिवाळीत कर्कश फटाक्यांनी अनेकांच्या कानठीळ्या बसवतात. आतापर्यंत रात्री दहानंतर फटाक्यांची आतषबाजी करून ध्वनी प्रदूषण केले जात असल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यावर निर्बंध आणले. न्यायालयाने रात्री आठ ते दहा वाजेपर्यंतची वेळ दिली होती. मात्र, तरीही कालमर्यादा झुगारून अनेक ठिकाणी फटाके फोडणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली.


१०० गुन्हे दाखल

मुंबई पोलिसांनी आतापर्यंत वेळमर्यादेनंतर फटाके फोडणाऱ्यांवर १०० गुन्हे दाखल केले असून, याप्रकरणी काहींची धरपकडही करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी बेकायदा फटाके विकणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत ५३ फटाके विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. दक्षिण मुंबई, पूर्व तसेच पश्चिम उपनगराच्या तुलनेत मध्य मुंबईमध्ये जास्त प्रमाणात फटाके वाजवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. याबाबत पोलिस ठाण्यात चौकशी केली असता प्रत्येक पोलिस ठाण्याला कारवाई करण्यासाठी टार्गेट दिलं होतं. त्यानुसार कारवाई केली जात असल्याचं एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.


कारवाईच्या नावाखाली पोलिसांची कमाई

पोलिसांनी केलेल्या कारवाईवर काही जणांनी आक्षेपही घेतला आहे. भोईवाडा पोलिसांनी एका मैदानात रात्री दहा वाजण्याच्या पूर्वीच एक मुलगा पाऊस पेटवत असताना त्याला ताब्यात घेतलं. मात्र त्यावर कारवाई करता येणार नाही. म्हणून पोलिसांनी त्या मुलाच्या वडिलांना ५ हजार ५० रुपयांचा दंड भरण्यास सांगितलं. विशेष म्हणजे पावती फक्त ५ हजार रुपयांचीच बनवली जात होती. मग ५० रुपये कशासाठी घेतले याबाबत पोलिसांनी काही सांगितलं नाही.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा