कुठे विकृती तर कुठे माणुसकी


SHARES

मुंबई - गोरेगावच्या जवाहरलाल नेहरूनगरमध्ये एक कुत्रा काही लोकांपासून जीव वाचवण्यासाठी पळत होता. तेवढ्यात काहीजण त्याला घेराव घालतात. त्याच्यावर काठ्यांनी हल्ला करतात. कुत्रा जिवाच्या आकांताने सुटण्याचा प्रयत्न करतो. पण सर्व प्रयत्न व्यर्थ ठरतात. तेवढ्यात एकजण थेट त्याच्या डोक्यावरच वार करतो. कुत्र्याला हा जीवघेणा वार सहन होत नाही आणि अखेर तो मान टाकतो. हे टोळकं इतक्यावरच थांबत नाही. तर मेल्यानंतरही या कुत्र्याला दोरी बांधून फरफटत नेण्यापर्यंत त्यांची मजल जाते.

याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. किसान भागवत नावाच्या इसमाला अटक करण्यात आली आहे. "जेव्हा आम्ही किसान भागवतला कुत्र्याला मारहाण का केली विचारलं असता कुत्रा त्याला चावल्याचा दावा या किसानने केला. पण, त्याच्या शरीरावर कुत्रा चावल्याच्या कुठल्याही जखमा नव्हत्या" असा दावा प्राणी मित्र भावीण गठानी यांनी केलाय.

तर, काही दिवसांपूर्वीच एका कुत्र्याला वाचवण्यासाठी मोटरमनने रेल्वेचा वेग कमी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. रेल्वेरुळावरून हा कुत्रा चालत होता. कदाचित मागून येणाऱ्या ट्रेनमुळे नेमकं कुठे जायचं हेच त्याला समजलं नाही. पण मोटारमनने भूतदया दाखवत रेल्वेचा वेग अत्यंत कमी ठेवला. या कुत्र्याच्या मागून रेल्वे चालवत प्लॅटफॉर्मवर आणली. कुत्रा दुसऱ्या मार्गाने निघून गेल्यानंतरच मोटारमनने रेल्वेचा वेग वाढवला.

एकीकडे प्राणीमात्रांवर दाखवलेली अपार प्रेमभावना तर दुसरीकडे क्रूरतेचा कळस आणि मुक्या प्राण्यांबद्दल या दोन्ही टोकाच्या भावना दाखवणारा मनुष्यप्राणी मात्र एकच.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा