माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावरील गोळीबारात आणि हत्येच्या कटात सहभागी अनुक्रमे सहभागी गुरमैल सिंह व मोहम्मद झिशार अख्तर यांच्यातील दुवा पोलिसांच्या हाती लागला आहे.
सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याप्रकरणी अमित हिसामसिंह कुमार (29) याला बुधवारी गुन्हे शाखेने अटक केली. त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले असून न्यायायलयाने त्याला पोलीस कोठडी सुनवली आहे. ही याप्रकरणातील 11 वी अटक आहे.
अमित कुमार हा हरियाणातील कैठाल तालुक्यातील नाथवान पट्टी येथील रहिवासी आहे. सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचणारा मोहम्मद झिशान अख्तर याच्या संपर्कात अमित कुमार होता.
अख्तरच्या सांगण्यावरून त्याने गुरमैलला बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत सहभागी होण्यास सांगितले होते. त्यासाठी त्याच्यापर्यंत काही रक्कमही पोहोचली असून त्याची तपासणी सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. अमित कुमारवर हरियाणामध्ये चार गुन्हे दाखल असून त्यात मारामारीच्या गुन्ह्यांचा सहभाग आहे.
आरोपीविरोधात कोणताही गंभीर गुन्हा दाखल नसल्याचे सूत्रांनी सांगितले. हत्येच्या कटातील काही रक्कम आरोपीपर्यंत पोहोचल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्याची तपासणी सध्या सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
तसेच आरोपी कोणत्या गुन्हेगारी टोळीशी संबंधित आहे, त्याचीही तपासणी सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
तसेच सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणारा शिव कुमार ऊर्फ शिवा गौतम याच्यासह आरोपींना मदत करणारा मोहम्मद झिशान अख्तर व कटात सहभागी शुभम लोणकर यांचा शोध सुरू असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी लुक आऊट सर्क्युलर जारी केले आहे.