घ्या ऐका, चोर म्हणे '५० व्या चोरीचा मला अभिमान'!


SHARE

एखादं चांगलं काम केल्यावर साहजिकच त्या व्यक्तिला कौतुकाची थाप मिळणारच किंवा त्याला त्याचा अभिमान होणारच. पण सराईत घरफोड्या करणाऱ्या एका चोराने चक्क चोरीचा अभिमान वाटत असल्याचं सांगितलंय.

मुंबईत सराईत घरफोड्या करणाऱ्या आरोपीला कांजूरमार्ग पोलिसांनी त्याच्या ५० व्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं. त्यावेळी न्यायाधीशांनी त्याला चोरी न करण्याचं आवाहन करत समजवण्याचा प्रयत्न केला असता त्याने निर्लज्जपणे "मला माझ्या ५० व्या चोरीचा अभिमान असल्याचं" सांगितलं. या आरोपीला न्यायालयाने ५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.



२१ तोळे सोने चोरले

कांजूरमार्ग परिसरात राहणारा मंगल उर्फ मंगल्या कमलाकर खरात (२२) याने एप्रिल महिन्यात कांजूरमार्गच्या फ्रेंड्स काॅलनीतील प्रगती अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सेवा निवृत्त विजया जाधव यांच्या घरी घरफोडी केली होती. विजया यांच्या घरातून त्याने तब्बल २१ तोळे सोने चोरले होते. याप्रकरणी विजया यांनी कांजूरमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता.

अशाच घरफोडीच्या गुन्ह्यात मंगलला पवई पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याचा ताबा कांजूरमार्ग पोलिसांनी घेतला. पोलिस तपासात मंगलवरील हा ५० वा गुन्हा असल्याचं निदर्शनास आलं. मंगल विरोधात आतापर्यंत पवई, विक्रोळी, भांडुप, कांजूरमार्ग, मुलुंड आणि इतर पोलिस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे.


मंगलला पोलिस कोठडी

अनेकदा पोलिसांनी त्याच्या विरोधात प्रतिंबधक कारवाई देखील केली आहे. मात्र मंगलमध्ये सुधारण्याचं कोणतंही लक्षण दिसत नाही. चोरीचे पैसे जुगारात आणि दारू पिण्यात तो उडवायचा. कांजूरमार्ग पोलिसांनी त्याचा ताबा घेतल्यानंतर त्याला शनिवारी न्यायालयात हजर केलं होतं. त्यावर सराईत गुन्ह्यांची नोंदी बघता न्यायाधीशांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मंगलने निर्लज्जपणे 'आज मी गुन्ह्यांची अर्ध सेंच्युरी केल्याचं कळलं. आणि मला त्याचा अभिमान ही असल्याचं सांगितलं' या नंतर न्यायाधीशांनी त्याला ५ आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.


हेही  वाचा -

सराईत दुचाकी चोराला अटक

संबंधित विषय
ताज्या बातम्या