बॉलिवूड अभिनेत्रीशी छेडछाड पडली महागात, आरोपीला ३ वर्षांचा तुरुंगवास

बॉलिवूड अभिनेत्री २०१७ मध्ये दिल्लीहून मुंबईत येत होती. तेव्हा विमानात तिच्यासोबत छेडछाड करण्यात आली होती.

SHARE

बॉलिवूडमधील बालकलाकारशी छेडछाड केल्याप्रकरणी आरोपी विकास सचदेवाला न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे. POCSO अॅक्टच्या सेक्शन ८ आणि आयपीसीच्या कलम ३५४ नुसार आरोपीला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय २५ हजार रुपयांचा दंडही आकारण्यात आला आहे.

काय होतं प्रकरण?

बॉलिवूड अभिनेत्री २०१७ मध्ये दिल्लीहून मुंबईत येत होती. तेव्हा विकास सचदेवानं विमानात तिच्यासोबत छेडछाड केली. या घटनेमुळे अभिनेत्रीला धक्का बसला. विमानातील संबंधित व्यक्तींकडे तक्रार करूनही त्यांनी कोणतीच मदत केली नाही. शेवटी मुंबईत उतरून अभिनेत्रीने लाइव्ह व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना याबद्दल सांगितलं आणि महिलांच्या सुरक्षेबद्दल प्रश्न उपस्थित केला. यानंतर तिनं आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता

आरोपीच्या कमाईवरच त्याचं घर चालतं, त्याच्या हातून पहिल्यांदा गुन्हा घडला आहे, त्याच्या नावावर दुसरा कोणताच गुन्हा दाखल नाही. त्यामुळे त्याची शिक्षा कमी करण्यात यावी, असा युक्तीवाद विकास सचदेवाच्या वकिलाकडून करण्यात आला. पण न्यायालयानं त्याची शिक्षा कमी केली नाही. आता ४१ वर्षीय विकास सचदेवा सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो.
संबंधित विषय
ताज्या बातम्या