कोरोनाच्या पाठोपाठ आता मालवेअर व्हायरसची भीती...


कोरोनाच्या पाठोपाठ आता मालवेअर व्हायरसची भीती...
SHARES
कोरोनामुळे देशासमोर मोठे संकट उभे असताना अशा परिस्थीतीचा सायबर गुन्हेगारांनी विविध मार्गांनी फसवणूक करण्यास सुरूवात केली आहे. त्या अंतर्गत ते मालवेअरचा वापर करण्याची शक्यता असल्यामुळे नागरीकांनी घरात असताना सावध राहून ऑनलाईन विश्वात वावरण्याची आवश्यकता आहे. सायबर पोलिस अशा परिस्थीतीवर विशेष लक्ष ठेऊन आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सायबर आरोपी मोबाईल संदेश व व्हॉट्स अॅपद्वारे विशेष लिंक असलेले संदेश पाठवण्याच्या तयारीत आहेत. अशा प्रकारे काही जणांची फसवणूक झाली असून त्यांनी  सायबर पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. तरी देशातील इतर सुरक्षा यंत्रणांकडून याबाबत माहितीची देवाण-घेवाण होत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले. याशिवाय 21 दिवसांच्या लॉक डाऊनच्या परिस्थिती अनेकजण(वर्क फ्रॉम होम) घरूनच कार्यालयाचे काम करत आहेत. अशा परिस्थीतीत मोबाईल अथवा लॅपटॉपवरून या संदेशातील लिंक क्लीक केल्यास सर्व महत्त्वपूर्ण माहिती चोरी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आरोपी डार्क वेबचा वापर करत असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे सुरक्षा यंत्रणांना कठीण असते.


अशाप्रकारे तुमची होऊ शकते फसवणूक
1)बनावट ई-बेवसाईट
सध्या मास्क व सॅनेटाझरचा तुटवडा असल्यामुळे ई-कॉमर्स संकेतस्थळांवरून त्यांची विक्री करत असल्याची माहिती अपलोड करत आहेत. बाहेर अधिक भावात मिळणारे मास्क व सॅनेटाझर ऐवजी आरोपी कमी किमतीत मास्क उपलब्ध करत असल्यामुळे नागरीक सहज त्यांच्या जाळ्यात फसतात. माटुंग्यातील 38 वर्षीय व्यक्तीला व्हॉट्सअॅपद्वारे लिंक प्राप्त झाली होती. त्या लिंकद्वारे त्याने 100 मास्कची मागणी केली. त्या लिंकद्वारे तो पोहोचलेल्या संकेतस्थळावर त्याला बँक खात्याची माहिती भरण्यास सांगण्यात आली. त्यानंतर त्याच्या खात्यातून 36 हजार रुपये काढण्यात आले.

2) कोरोना मदत निधी
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर नागरीकांमध्ये भीती सोबत सहानभूतीही आहे. याच सहानभूतीचा फायदा उचलून सायबर गुन्हेगार बनावट संकेस्थळ अथवा लिंक तयार करत आहेत. त्यात एखाद्या व्यक्ती अथवा ठिकाणावरील भयाण परिस्थीतीची माहिती देऊन मदतीचे आवाहन केले जाते. अशा परिस्थितीत अनेकजण या फसव्या माहितीला भूलून पैसे आरोपींनी दिलेल्या खात्यामध्ये जमा करतात.

3) विशिंग कॉल
कोरोना वायरसच्या परिस्थीतीत नागरीकांमध्ये भीतीचे वातावर असल्यामुळे विशिंग कॉल करणारे आरोपी या परिस्थीतीचा वापर करून सरकारी संस्था अथवा रुग्णालयांच्या नावाने दूरध्वनी करू शकतात. अशा परिस्थितीत बोलण्यात गुंतवून बँकेची माहिती घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अथवा लिंक पाठून माहिती भरण्याच्या नावानेही बँकेची माहिती घेतली जाऊ शकते. त्यामुळे नागरीकांनी सावध रहावे, असे सायबर तज्ज्ञ सांगत आहेत.

4) समाज माध्यमांवरील अफवा
फेसबुक, वॉट्‌सऍप, इन्स्टाग्राम या समाज माध्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. समाजातील काही विकृत तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे घटक समाजमाध्यामाद्वारे यासंदर्भात मुद्दाम खोट्या बातम्या आणि अफवा पसरवून समाजात भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नावाने खोटे परिपत्रक जारी करण्यात आले होते. त्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमवर महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश व सिक्कीम या चार राज्यांमध्ये 14 ते 21 मार्चपर्यंत सुट्या जाहीर करण्यात आल्याचा खोटा संदेश प्रसारीत करण्यात आला होता. प्रत्यक्षात हा बनावट संदेश असल्याचे निष्पन्न झाले होते. हा खोडसाळपणा कोणी केला याबाबत चौकशी करण्याचे आदेश सायबर पोलिसांना देण्यात आले आहेत. तसेच तोतया डॉक्‍टरांडून कोरानाच्या लसी, औषधे व उपचारांबाबत खोटे दावे करण्यात येत आहेत. अशा संदेशांबाबतची तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा