सायन रुग्णालयामध्ये मृतदेहाची अदलाबदल; २ डॉक्टर निलंबित


सायन रुग्णालयामध्ये मृतदेहाची अदलाबदल; २ डॉक्टर निलंबित
SHARES

मृतदेहाची अदलाबदल केल्याची धक्कादायक घटना महापालिकेच्या सायन रुग्णालयात घडली आहे. सायन रुग्णालयानं अंकुश सुरवडे २८ या मृतव्यक्तीचा मृतदेख भलत्याच लोकांच्या हाती दिला व त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार ही करण्यात आल्यानं एकाच गोंधळ उडाला. अंकुशचा शनिवारी रात्री मृत्यू झाला होता. याप्रकरणी अंकुशच्या नातेवाईकांनी रुग्णालयाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

महापालिकेच्या सायन रूग्णालयातील गलथान कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. याप्रकरणी फॉरेन्सिक विभागातील २ डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आहे. व्यवसायाने डान्सर असलेला अंकुश गौतम सुरवडे याचा १० दिवसांपूर्वी वडाळा येथे पूर्व मुक्त मार्गावर अपघात झाला होता. त्याला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना अंकुशचा शनिवारी रात्री मृत्यू झाला.

अंकुशच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह घेण्यासाठी कुटुंबीय रुग्णालयात गेले असता त्यांना मृतदेह देण्यात आला नाही. मृतदेह दिला जात नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी तगादा लावला असता दुसऱ्याच रुग्णाच्या कुटूंबियांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अंकुशच्या मृतदेहावर सायन येथील स्मशानभूमीत दुसऱ्याच रुग्णाच्या कुटुंबियांनी अंत्यसंस्कार केले.

मृतदेह पॅकिंग करून देण्यात आल्याने चेहरा न बघताच मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचे दुसऱ्या रुग्णाच्या कुटुंबियांनी अंकुशच्या नातेवाईकांना सांगितले. या प्रकरणी अंकुशच्या नातेवाईकांना तसेच वडाळा विभागातील नागरिकांनी सायन रुग्णालय प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गर्दी केली होती. रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. अंकूशचे कुटुंबीय गुन्हा दाखल करण्यासाठी सायन पोलीस ठाण्यात गेले असता त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर जमाव जमला असून तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा