झिंगाडाचा ताबा मिळवण्यासाठी पाकिस्तानकडून न्यायालयात फेरविचारणीची मागणी


झिंगाडाचा ताबा मिळवण्यासाठी पाकिस्तानकडून न्यायालयात फेरविचारणीची मागणी
SHARES

छोटा राजनच्या जबाबामुळेच दाऊदचा हस्तक मुदस्सर हुसेन सय्यद ऊर्फ मुन्ना झिंगाडा हा भारतीय नागरिक असल्याचा निर्णय थायलंड न्यायालयाने दिला. मात्र या निर्णयावर फेरविचार करण्यात यावा याबाबत पाकिस्तानने थायलंड न्यायालयात दावा केला आहे. यासाठी पाकिस्तानकडून मुन्ना झिंगाडाची कागदपत्रंही सादर करण्यात आली आहेत.

मात्र इंटरपोलकडे मुंबई पोलिसांनी दिलेल्या छोटा राजनच्या जबाबामुळे मुन्ना झिंगाडाचा ताबा भारतीय सुरक्षा यंत्रणांना मिळू शकणार आहे. त्यामुळे झिंगाडाला आणण्याच्या तयारीला आता सुरुवात झाली आहे. झिंगाडाला देखील मुंबईत न आणता त्याला दिल्लीतील विशेष कारागृहात ठेवलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


७० पेक्षा जास्त गुन्हे

मुंबईतील जोगेश्वरी इथं राहणाऱ्या झिंगाडावर भारतात ७० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. छोटा राजनवर बँकॉकमध्ये २००१ मध्ये जिवघेणा हल्ला करणारा छोटा शकीलचा हस्तक मुन्ना झिंगाडा याला थायलंड पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला १२ वर्ष कैदेची शिक्षा सुनावण्यात आली. त्याच्या शिक्षेचा काळ पूर्ण झाल्यानंतर आता मुन्नाचा ताबा मिळवण्यासाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक वर्षांपासून जोरदार रस्सीखेच सुरू होती.

अखेर छोटा राजनच्या अटकेनंतर त्याच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा जबाब आणि मुन्ना झिंगाडा हा भारतीय नागरिक असल्याचा ठोस पुरावा भारतीय सुरक्षा यंत्रणांनी थायलंड न्यायालयात सादर केला. या महत्वाच्या पुराव्याच्या आधारे थायंलड पोलिसांनी मुन्नाचा ताबा भारतीय सुरक्षा यंत्रणांना देण्याचा निर्णय घेतला.


मुन्ना पाकिस्तानी नागरिक?

मात्र या निर्णयावरही पाकिस्तानकडून फेरविचारचा अर्ज देत मुन्ना हा पाकिस्तानी नागरिक असल्याचं सांगत तशी कागदपत्रं सादर केली. भारतीयांना मुन्नाचा ताबा मिळाल्यास पाकिस्तानातील दाऊद आणि शकिलचे वास्तव जगासमोर येईल. इतकंच नव्हे तर पाकिस्तान दहशतवाद्यांना कशा प्रकारे मदत करत आहे. हे देखील पुढे येण्याची शक्यता असल्यानं पाकिस्तानकडून भारतीयांच्या हाती मुन्ना झिंगाडाला लागू देत नाहीत.


'आयएसआय'ची खेळी

दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील पाकिस्तानात असून 'आयएसआय'च्या छत्रछायेखाली आहेत. छोटा राजनवर बँकॉकच्या हॉटेलमध्ये हल्ला करणाऱ्या मुन्नालाही आपल्या छत्राखाली आणण्यासाठी 'आयएसआय'ने ही चाल खेळल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. 'आयएसआय'ने एका अज्ञात व्यक्तीमार्फत पाकिस्तानी पासपोर्ट मुन्नापर्यंत पोहोचवला. त्याच्याच आधारावर मुन्नाने तो पाकिस्तानी असल्याचा दावा केला.


छोटा राजनचा जबाब

बँकाक इथं कुख्यात गुंड राजन निकाळजे उर्फ छोटा राजन याच्या अटकेनंतर अनेक नवनवीन खुलासे पुढे आले. राजनच्या जबाबामुळे झिंगाडा भारतीय नागरिक असल्याचं सिद्ध झाल्यानंतर झिंगाडाला आणण्यासाठीच्या सुरक्षा यंत्रणांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.
मात्र झिंगाडावर सर्वाधिक गुन्हे हे जरी मुंबईत दाखल असले. तरी छोटा राजनप्रमाणे त्याचाही ताबा मुंबई पोलिसांना मिळणार नसल्याचं कळतं. त्यामुळेच झिंगाडाचं प्रत्यार्पण झाल्यास त्याला देखील दिल्लीतल्या विशेष जेलमध्ये ठेवले जाणार असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं.

संबंधित विषय