मुलुंडमध्ये तरुणीवर जबरदस्ती, आरोपी गजाआड!


मुलुंडमध्ये तरुणीवर जबरदस्ती, आरोपी गजाआड!
SHARES

आधीच विनयभंगाच्या आरोपाखाली जामिनावर सुटलेल्या दीपक माने या नराधमाने पुन्हा एकदा मुलुंडच्या स्वप्ननगरी परिसरात एका 16 वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीसोबत अश्लील चाळे करत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे.


कसा घडला गुन्हा?

दीपक माने हा व्यवसायाने ड्रायव्हर असून त्याने सोमवारी या मुलीचा रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दुचाकीने पाठलाग केला आणि आपण तुझ्या वडिलांचे मित्र असून तुला घरापर्यंत सोडतो असं सांगितलं. त्यावर या मुलीने त्याच्यासोबत जाण्यास संमती दर्शविली. एका अनोळखी ठिकाणी त्याने गाडी बाजूला लावून एका बसच्या मागे खेचत नेऊन तिच्यासोबत जबरदस्ती केली. परंतु, सुदैवाने ही मुलगी त्याच्या तावडीतून सुटून पळून जाण्यात यशस्वी ठरली.


लागलीच गुन्हा नोंदवल्याने आरोपी गजाआड

घरी गेल्यानंतर तिने घडला प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर तिने आईसोबत तात्काळ मुलुंड पोलीस ठाणे गाठत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मुलुंड पोलिसांनी देखील याची गंभीरता ओळखत तात्काळ तपास सुरु करून आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या. आरोपी दीपक माने सध्या गजाआड असून त्याच्यावर महिलेसोबत छेडछाड केल्या प्रकरणी आत्तापर्यंत दोन गुन्हे दाखल आहेत.

मागील वर्षी देखील अशाच प्रकारे एका शाळकरी मुलीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. परंतु, त्यातून तो जामिनावर बाहेर सुटला होता. आता पुन्हा त्याने तेच कृत्य केले आहे.

मुलीच्या तक्रारीनंतर कलम ३५४ अ आणि पॉस्कोअंतर्गत दीपक विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांनी दिली आहे.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा